दरडी कोसळल्याने मोरणा खोरे हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:26+5:302021-07-24T04:23:26+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी दरडी कोसळल्या असून, या घटनेमुळे मोरणा ...

Morna Valley was shaken by the collapse of Dardi | दरडी कोसळल्याने मोरणा खोरे हादरले

दरडी कोसळल्याने मोरणा खोरे हादरले

googlenewsNext

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी दरडी कोसळल्या असून, या घटनेमुळे मोरणा खोरे हादरले आहे. यामध्ये मोठी जीवित व वित्तहानी झालेली आहे. मिरगाव येथे एक मृतदेह आढळून आला आहे. भूस्खलनामुळे अनेक व्यक्ती गाडल्या गेल्या असल्यामुळे एनडीआरएफच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल ३५ बेपत्ता लोकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.

सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. गुरुवारी रात्रीही पावसाचा जोर कायम होता. शुक्रवारीही पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत राहिल्या. सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना परिसरात ६१० मिलीमीटर, नवजाला ७४६ मिलीमीटर व महाबळेश्वरला ५५६ मिलीमीटर इतका पाऊस झाला, तर शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत कोयनेत १३० मिलीमीटर, नवजाला १३० मिलीमीटर, महाबळेश्वरात १४६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.

पाटण तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला असून नवजा, मोरगिरी खोऱ्यात शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आहेत. भूस्खलनाने शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे. आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, मोरगिरी-गुंजाळे येथे कोसळलेल्या दरडीखाली अनेक घरे गाडली गेली असून, सुमारे तीस जण त्याखाली दबले गेले आहेत, तर पन्नासपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंढवली) येथे ७ घरांवर दरड कोसळली होती. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. १५ जनावरे आणि २५ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले यांनी घटनास्थळी मदतकार्य पोहोचवले. आ. पाटील हे घटना घडल्यानंतर गुरुवारी घटनास्थळी गेले होते, त्यानंतर ते वाई तालुक्यातच ठाण मांडून होते. येथील ढिगाऱ्यात अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तालुक्यातील जोर या ठिकाणी घरात अतिवृष्टीचे पाणी शिरल्याने अनिता पांडुरंग सपकाळ (वय ४५) व सचिन पांडुरंग सपकाळ (वय २२) हे मायलेक वाहून गेले आहेत, तसेच महाबळेश्वर तालुक्यामध्ये ५९४.०४ मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटला असून, मौजे धावरी या ठिकाणी एक व्यक्ती मृत्युमुखी पडली आहे.

जावली तालुक्यातील रेंगडेवाडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी तानाबाई किसन कासुर्डे (वय ५०) आणि भागाबाई सहदेव कासुर्डे (वय ५०) या महिलांचे मृतदेह सापडले. मात्र, आणखी दोघे अजूनही बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

एनडीआरएफ टीमच्या मदतीने पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथे दरड हटवून बाधितांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून, यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तत्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे.

पॉइंटर

- जोरमध्ये मायलेक गेले वाहून- पाटण तालुक्यातील चार गावांत दरडी कोसळल्या

- कोंढवली येथे २७ जणांची सुटका

- कोयनेतून पाण्याचा विसर्ग

- मोरगिरी खोऱ्यात ‘माळीण’

- मिरगाव, आंबेघर, ढोकवळे येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

- नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

- नांदगाव, श्रीक्षेत्र पाली येथेही पाणी घुसले

- एनडीआरएफचे दुसरे पथक दाखल

फोटो नेम : २३सातारा०१

फोटो ओळ :

पाटण तालुक्यातील आंबेघर गावावर याच डोंगरातून दरड कोसळून घरे ढिगाऱ्याखाली गेली.

Web Title: Morna Valley was shaken by the collapse of Dardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.