पुसेगाव :
जिल्ह्यातील संचारबंदीचे निर्बंध आता शिथिल करण्यात आले असून, महिनाभरानंतर पुसेगावची बाजारपेठ खुली करण्यात आली. दुकाने सुरू झाल्याने ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली.
जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच रुद्रावतार धारण केला होता. मोठ्या प्रमाणावर नागरिक बाधित झाले होते. मृत्यूचा दरही वाढला होता. उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कालांतराने खटाव-माण तालुका प्रतिबंधित क्षेत्रात आल्याने जरी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात इतर ठिकाणी बाजारपेठ सुरू झाली तरी पुसेगाव मात्र बंदच राहिले.
दि. २१ च्या आदेशानंतर पुसेगाव बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सुरू करण्यात आल्याने व्यापारी, दुकानदार तसेच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बराच काळ अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद राहिल्याने व्यापारी, दुकानदार, कामाला असलेले कर्मचारी, शेतकरी तसेच नागरिकांचे मोठे हाल झाले. लग्नसराईचा हंगाम पूर्ण मोकळा गेल्यामुळे कापड, भांडी, फोटोग्राफी, बँड व संबंधित व्यवसाय पूर्णपणे कोलमडून गेले.
फोटो : २२ पुसेगाव
पुसेगावची बाजारपेठ सुरू झाल्याने पुसेगावसह आसपासच्या गावांतील व वाड्यावस्त्यांवरील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. (छाया : केशव जाधव)