सारांश वृत्त
मोळाचा ओढा-कोंडवे
रस्त्याची दुरवस्था
सातारा : साताऱ्यातील मोळाचा ओढा ते कोंडवे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघातही झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाने या खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
व्यापारी पेठेत
शुकशुकाट कायम
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यात आले. किराणा, भाजीपाला यासह अत्यावश्यक सेवेची दुकाने सोमवारपासून सुरू झाली. मात्र या दुकानांना सकाळी नऊ ते दुपारी दोन असे वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. इतर आस्थापनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे साताऱ्यातील व्यापारी पेठेत सोमवारी दिवसभर शुकशुकाट जाणवला.
यवतेश्वर घाटात
डांबरीकरण
सातारा : सातारा-कास मार्गावर असलेल्या येवतेश्वर घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या मार्गावरून प्रवास करणेही धोक्याचे ठरू लागले होते. मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाकडून निम्म्या घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. खराब रस्त्यांमुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून हैराण झालेल्या वाहनधारकांसह ग्रामस्थांना या कामामुळे मोठा दिलासा मिळाला आहे . उर्वरित काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे.