पळशी : माण तालुक्यातील मोही येथे कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. रोज नव्या रुग्णांची संख्या वाढत असून, यामुळे गावात धास्तीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मोही गावात आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लावल्याचे सरपंच पद्मा देवकर व आपत्ती व्यवस्थापन समितीने मोही येथे आयोजित बैठकीत जाहीर केले.
बैठकीस ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील व सर्व व्यापारी वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या मोही गावात ३४ पॉझिटिव्ह रुग्ण असून १८ रुग्ण बरे झाले आहेत तर १६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण असून, साखळी तोडण्यासाठी गावात २१ ते ३० एप्रिलदरम्यान बंद पाळण्यात येणार आहे.
यावेळी सातारा-मुंबई-पुणे आदी शहरांतून आलेल्या व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयात नावनोंदणी करण्याबरोबरच कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. आठ दिवसांच्या जनता कर्फ्यू दरम्यान गावातील दूध, मेडिकल, दवाखाना वगळता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतील, असा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला.
तसेच कर्फ्यूदरम्यान कोणत्याही व्यापाऱ्याने मालाची देवाण-घेवाण करू नये. तसे निदर्शनास आल्यास दुकानदारास एक हजार रुपयाचा दंड तर खरेदीदारास पाचशे रुपयांचा दंड करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बंद काळात गावात देखरेख ठेवण्यासाठी तरुणांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन केले आहे.
गावात विनाकारण कोणीही फिरू नये, मास्कचा वापर करावा, नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच पद्मा देवकर यांनी बैठकीत केले.