सन्मती देशमाने यांच्या पहिला रंजक किस्सा आहे. ते वीस वर्षांचे असताना १९९१मध्ये शिरोळ येथील दत्तनगरमध्ये ‘सासर माहेर’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. त्यात देशमाने यांचे भाऊ स्टील फोटोग्राफरची जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे सात-आठ दिवस देशमाने हेदेखील चित्रीकरणाच्या ठिकाणी भावासोबत गेले होते. या चित्रपटात मुख्य भूमिका डॉ. निशिगंधा वाड साकारत होत्या. त्यांच्याशी चांगली ओळख झाली. अन् एकदिवस देशमाने यांनी वाड यांच्याकडे सहीची मागणी केली. वाड यांनी सही दिली. त्यामध्ये हसरा चेहरा होता. ती सही पाहिल्यानंतर देशमाने यांनाही प्रसन्न वाटले. सही दिल्यानंतर निशिगंधा वाड यांनी देशमाने यांनाही सही करण्यास सांगितले. अन् त्या म्हणाल्या, ‘तुझी सही पण फारच चांगली आहे. यामध्ये असाच चेहरा काढला तर आणखी सुंदर होईल.’ अन् तेव्हापासून सहीत बदल केला. हसरा चेहरा असलेलीच सही त्यानंतर कायम केली. शासकीय दस्ताऐवज, आर्थिक व्यवहारात याच सहीचा वापर करत ते असतात.
पुढे ते सातारा जिल्हा परिषदेत शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्याकडे अनेक शाळांची जबाबदारी होती. यात कामाचा भाग म्हणून सही करावी लागते. त्यामधील हसऱ्या चेहऱ्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे आपणाला प्रभावित करण्यासाठी हे अशी सही करत असल्याची तक्रार करण्यात आली. पण ही सही कोणाला इंप्रेस करण्यासाठी नसून, १९९१पासून करत असल्याचे सांगितल्यावर सगळं मिटलं. पण हा किस्सा ते अजूनही सांगतात. त्याचप्रमाणे एका दुकानदाराने त्यांची सही पाहिल्यानंतर एक पेन भेट म्हणून दिला होता.
चौकट :
मूडवर ठरतोय चेहरा
देशमाने यांना सहीत असलेल्या चेहऱ्याबाबत अनेकदा गमतीशीर अनुभव आले आहेत. यामध्ये आपला मूड चांगला असेल तर चेहऱ्यातील डोळे, नाक, तोंडही छान होते. मूड चिडलेला, एखाद्या गोष्टीचा राग आलेला असल्यास चेहराही रागीट भासतो अन् काहीवेळेस गडबडीत सही करावी लागली तर नाक, तोंड हलतं, वेडंवाकडं होतं अन् ते कार्टून वाटतं.
कोट
आपली सही कशी असावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे कोणाला इंप्रेस करण्याचा प्रश्न नाही. पण आपली सही आपणाला व इतरांना आनंद देणारी असायला हवी. हाच चांगला अनुभव जास्तवेळा आला आहे.
- सन्मती देशमाने,
मुख्याध्यापक, प्रतापसिंह हायस्कूल, सातारा.
एस/युजर/प्रुफ/०५संडे/०५जगदीश