कोरोनाचे महाभयंकर संकट एका बाजूला घोंगावत असतानाच कृष्णा कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी ३०० वर इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, छाननीचे सोपस्कार पार पडल्यानंतर व दुबार अर्ज बाजूला केल्यानंतर २१३ अर्ज उरले आहेत. वास्तविक २ तारखेपासून अर्ज माघार घ्यायला उमेदवारांना परवानगी होती. पण गत १२ दिवसात फक्त १७ जणांनी अर्ज मागे घेतलेले दिसतात. कारखान्याचे २१ संचालक निवडले जाणार आहेत. तिरंगी लढत गृहीत धरली तरी ६३ उमेदवार अपेक्षित आहेत. पण आजअखेर १९६ जणांचे अर्ज तसेच दिसतात. याचा अर्थ असाही माघारीसाठी अजूनही म्हणावी तशी गती नाही.
डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलमधून यावेळीही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. सत्ताधारी म्हणून ते साहजिकही आहे .... विरोधी असणाऱ्या डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत व अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलमधूनही इच्छुक कमी नाहीत बरं .... सध्या अनेक ‘हौसे नवसे’ ही या निवडणुकीत दिसतात. त्यांना ही निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे सुरुवातीला अर्ज दाखल करताना ‘तुम्ही म्हणाल तसं’ असं म्हणणारेच आज आढेवेढे घेताना दिसत आहेत. त्यामुळे या इच्छुकांची मनधरणी करणं नेत्यांना क्रमप्राप्त झालं आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत आज तिरंगी लढत गृहीत धरली जातेय. प्रचाराला भलताच जोर चढलाय; तिन्ही पॅनल प्रमुख विजय आपलाच आहे. असा दावा करत आहेत. अशावेळी आपलेच पॅनल विजयी होणार आहे तर मग माघार कशासाठी घ्यायची? अशा भावना इच्छुकांच्यात तयार होत आहेत. अशावेळी या इच्छुकांची मनधरणी करताना नेते त्यांना स्वीकृत संचालक पदाचे ‘गाजर’ दाखवताना दिसत आहेत. पण अनेकांना ‘गाजर हलवा’ ही गोष्ट चांगली माहीत आहे. त्यामुळे हे गाजर त्यांच्या पचनी पडताना दिसत नाही. शिवाय स्वीकृत संचालक पदे फक्त दोनच आहेत. पण त्याचा शब्द किती जणांना दिला आहे याबद्दल इच्छुकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे तर कृष्णा उद्योग समूह आहे. त्यामुळे मनधरणी करताना उद्योग समूहातील इतर दुसऱ्या संस्थेत काम करण्याची संधी देतो असे ही शब्द आता दिले जात आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येते हे तीन दिवसांनंतर स्पष्ट होईलच.
वास्तविक १७ जून ही अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात उमेदवारी व पॅनल निश्चितीच्या दृष्टीने बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. सध्या तरी अनेक इच्छुक ‘राजकारणात थांबला तो संपला’ या मतावर ठाम आहेत. तर नेते त्यांना ‘लांब उडी मारायची असेल तर दोन पावले मागे घ्यावी लागतात’ असा सल्ला देत आहेत. येणारे तीन दिवस कृष्णा निवडणुकीसाठी महत्त्वाचे आहेत. या तीन दिवसात मनधरणी करण्यात कोण प्रभावी ठरतेय हे महत्त्वाचे आहे. आता इच्छुकांना गोळी, इंजेक्शन, सलाईन यातील कशाचा गुण येतोय ते कळलेही. पण काहींची शस्त्रक्रियाही केली जाईल. पण वेदना होणार नाही याची काळजी घेऊन.
प्रमोद सुकरे, कराड