कऱ्हाड : ‘विरोधकांचे अजूनही एकत्रीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी एकच धोरण ठेवावे, ‘माझा कारखाना माझी जबाबदारी’ कारखाना वाचला तरच सभासद जगणार आहे,’ असे मत ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी व्यक्त केले.
रेठरे बुद्रुक ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाठार येथे सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे निवडणूक प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांच्या हस्ते व मदनराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
या वेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, निवासराव थोरात, पैलवान शिवाजीराव जाधव, पांडुरंग होनमाने, सुजीत मोरे, सहकार पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय देसाई, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते भीमराव पाटील आणि मदनराव मोहिते यांनी प्रचाराचा प्रारंभ केल्याने सहकार पॅनेलचा विजयी प्रवास सुरू झाला आहे. गेल्या ६ वर्षांत सहकार पॅनेलने सभासदांच्या अपेक्षा चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या आहेत. कारखाना भक्कम स्थितीत आहे. अनेक लोक सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहे.’
फोटो ओळी : १५ कृष्णा मदनराव मोहिते
वाठार, ता. कऱ्हाड येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.