माउलींची पालखी बरडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:51 PM2018-07-16T22:51:31+5:302018-07-16T22:51:46+5:30

Mauli's Palkhi in Burda | माउलींची पालखी बरडमध्ये

माउलींची पालखी बरडमध्ये

Next


वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.
फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या मनीचि आवडी, पंढरपुरा नेईन गुडी’ याप्रमाणे पांडुरंगाच्या भेटीची आस मनात घेऊन बरडकडे मार्गस्थ झाला.
वाटेत धुळदेव येथे परशुराम फरांदे, व्यंकटराव दडस, माणिकराव कर्णे, सुभाष शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले. कोळकी, सोमंथळी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी, भाडळी ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले.
हरिनामाचा गजर व टाळ मृदंगाच्या निनादात पालखी सोहळा न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच प्रशांत जाधव, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समितीचे सदस्या सुशीला नाळे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, सचिन भोसले, अशोकराव पवार, डॉ. उत्तमराव शेंडे यांनी स्वागत केले.
वाजेगाव येथे दुपारचा विसावा घेतला. तेथे सरपंच संगीता निंबाळकर, उपसरपंच रवींद्र भोसले, सुजित रणवरे, अमोल निंबाळकर, मोहन नाईक-निंबाळकर, शंभूराज निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, श्रीकांत निंबाळकर, लालासाहेब निंबाळकर यांनी स्वागत केले. काही काळ विश्रांती घेऊन वारकरी मुक्कामासाठी बरडकडे मार्गस्थ झाले. सायंकाळी बरडला विसावले. सरपंच तृप्ती गावडे, उपसरपंच गोरख टेंबरे, जिल्हा परिषद सदस्य भावना सोनवलकर, नानासाहेब लंगुटे, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी स्वागत केले.
आज सोलापूर जिल्ह्यात
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गेले चार दिवस सातारा जिल्ह्यात आहे. तो मंगळवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी येथे निरोप तर सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.

Web Title: Mauli's Palkhi in Burda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.