मल्हारपेठ : निवडणूक आयोगाच्या सुधारित नियमांमुळे जात पडताळणी प्रमाणपत्र न सादर केल्याने मल्हारपेठ ग्रामपंचायत सरपंच निवड लांबणीवर पडली आहे. आरक्षित सरपंचपद मिळणार की नाही, यामुळे इच्छुक उमेदवार चिंताग्रस्त झालेत. सध्या गावकारभारी उपसरपंच असल्याने सर्व काही आलबेल आहे. मल्हारपेठ येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरपंचपद हे नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्याप्रमाणे या पदासाठी नानासाहेब कुंभार हे प्रथम अडीच वर्षांसाठी सरपंच झाले. सत्ताधारी गटाचे आठ व विरोधी गटाचे तीन असे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी देसाई गटाने सरपंच व उपसरपंचपद हे गटात काही वर्षांसाठी वाटून घेतले होते. तो कालावधी संपल्यानंतर खऱ्या अर्थाने बदलाचे वारे वाहू लागले. परंतु ठरल्याप्रमाणे नानासाहेब कुंभार यांनी देखील सरपंच पदाचा राजीनामा दिला.त्यानंतर रितसर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचे दावेदार गौरीहर दशवंत यांनी अर्ज दाखल केला. मात्र निवडणूक अर्ज दाखल करताना गौरीहर दशवंत हे सर्वसाधारण पुरुष गटातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. उमेदवार मागास प्रवर्गाचे असले तरी सर्वसाधारण गटातून निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांना त्यावेळी जातपडताळणी प्रमाणपत्र लागू झाले नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जातपडताळणी करणे व त्याबाबतचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असते. जातपडताळणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभाग तशा आशयाची हमी पावती देतो व ती पावती अर्जासोबत जोडावी लागते.हे प्रमाणपत्र मी निवडणूक झाल्यानंतर स्वत:हून कार्यालयाला सादर करीन, असे अर्जासोबत लिहून दिले जाते. मात्र, निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी आनंदराव संकपाळ यांनी गौरीहर दशवंत यांचा अर्ज तपासताना त्यांनी अर्जासोबत जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावेळी कार्यकर्त्यांची भंबेरी उडाली. कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी वाद घातला. मात्र, नियमाप्रमाणे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे संकपाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्ते व अधिकाऱ्यांत हमरीतुमरी झाली. काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.एकंदरीत पाटण तालुक्यातील मल्हारपेठवासीयांना आता गावकारभारी मिळण्याच्या आशा सध्याच्या स्थितीत तरी लांबल्या आहेत, असे दिसून येऊ लागले आहे. (वार्ताहर)
मल्हारपेठची सरपंच निवड रखडली
By admin | Updated: April 15, 2016 23:34 IST