मलकापूर : ‘येथील नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांविरोधी धोरण स्वीकारले आहे. मनमानी कारभार करत सर्वसामान्यांना न परवडेल अशी अन्यायकारक पाणीपट्टीत वाढ केली आहे. कारभाराविरोधात अन्याय निवारण कृती समिती संघर्ष करणार आहे. दरवाढ मागे न घेतल्यास नगरपंचायतीसमोर उपोषण करणार आहोत,’ असे मत अशोकराव थोरात व अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.मलकापुरात सत्ताधाऱ्यांनी २४ बाय ७ पाणीयोजनेचा अकारण गवगवा केलेला आहे. ही योजना सक्षमपणे चालविण्यात ते अपयशी ठरत आहेत. पाणी टंचाईच्या काळात चोवीस तास पाणी देऊन पाण्याची नासाडी करत आहेत. सर्वसामान्यांच्या वापराप्रमाणे येणाऱ्या स्लॅबवर पाणीपट्टीचा दर हजार लिटरला पाच रुपयांनी वाढविला आहे. तर याउलट व्यावसायिकांना दर हजार लिटरला एक ते दीड रुपया वाढ करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे. ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी. त्याचबरोबर शहराचा नगरविकास आराखडा मंजूर नसताना शेतकऱ्यांच्या रानातून बेकायदेशीर कामे करत आहेत. ही बेकायदेशीर कामे त्वरित थांबवावित अन्यथा, अन्याय निवारण समितीच्या वतीने नगरपंचायतीसमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे. पत्रकावर अशोकराव थोरात, सुधाकर शिंदे, अंकुश जगदाळेंसह सतरा नागरिकांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
मलकापूर नगरपंचायतीकडून पाणीपट्टीत अन्यायकारक वाढ
By admin | Updated: May 25, 2016 00:19 IST