लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : मक्याला यंदा उच्चांकी भाव मिळण्याची शक्यता आहे. खटाव तालुक्यातील मका लागवडीखालील क्षेत्र यावर्षी कमी झालेले असतानाच जनावरांच्या हत्तीघासाची कुट्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मका तोडला जात आहे. बाजारपेठेत मक्याला दोन हजार प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हा दर मका पिकाच्या हमीभावापेक्षा जादा आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून खरी मका पिकाची आवक सुरू होते. पंधरा ऑक्टोबरनंतर रब्बी मका पेरणी सुरू होते. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला झुकते माप दिले आहे. अनेक ठिकाणी उसाची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे खरीप मका पिकाचे उत्पादन कमी होणार आहे. परिणामी ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या मार्केटिंग वर्षात मका पिकाला चांगला दर अपेक्षित आहे. सध्या मका पिकाला २००० ते २१०० रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत आहे. त्याअनुषंगाने यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बीत मक्याखालील क्षेत्र वाढविणे फायदेशीर ठरणार आहे. तालुक्यातील येरळा नदीच्या लगत परिसरातील गावात येरळवाडी, अंबवडे, खटाव, गणेशवाडी, बनपुरी, सूर्याचीवाडी, वाकेश्वर, भुरकवडी आदी गावांतील तालुक्यात मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अलीकडच्या काळात दुधाळ जनावरांसाठी मक्यापासून हत्ती घास तयार करण्याला जास्त पसंती दिली जात आहे. त्यामुळे अडीच महिन्यांतच शेतकरी मका, हत्ती घासाला विकून टाकतात. विकत घेणारा स्वतः मका तोडून त्याची कुट्टी करून घेऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना सोंगणीचा खर्चही येत नाही. तसेच त्यातून शेतकऱ्यांना एकरी पस्तीस ते चाळीस हजार रुपये मिळतात. शिवाय रानही झटपट पुढील पिकाला मोकळे होते. त्यामुळे मक्याचे सोंगटी करून दाणे करण्याचे प्रमाण दिवसागणी कमी होत चालले आहे. खटाव तालुक्यातील वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१७ पर्यंत दैनंदिन हजारो क्विंटल मक्याची आवक असायची, आता ही आवक घटली आहे. त्यामुळे यंदा मका पिकाचे बाजारभाव तेजीत राहणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.
चौकट..
मका पेरणी क्षेत्र
वडूज मंडळ -१२०९.००
पुसेगाव मंडळ -४९०.००
औंध मंडळ -५०५.००
मायणी मंडळ -१९४५.००
एकूण तालुका मका पेरणी क्षेत्र - ४४८४.०० हेक्टर
(कोट)
ऊसक्षेत्रात टोकलेली अर्धा एकर मका उत्पादनात गुंठ्यामागे सरासरी हजार रुपये मिळाले. अर्धा एकरात वीस हजार रुपये उत्पन्न मिळाले. हत्ती घासाला प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे रुपये दर मिळाला. तर ओला मका वैरण १२०० ते १५०० रुपये टन दर होता. आता पुन्हा नव्याने मका लागवड केली आहे.
-एस. के. पिसाळ, शेतकरी, चोराडे
फोटो: संग्रहित मक्याचे कणीस फोटो वापरणे.