लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लवकरच होणार असून बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या होणाऱ्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘राजकीय महानाट्य’ रंगण्याची शक्यता आहे. या घडामोडींकडे सहकार विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळामध्ये रथी-महारथींचा समावेश आहे. आता निवडणूक तोंडावर असल्याने ही सर्व मंडळी वार्षिक सभेच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. विशेषत: आगामी निवडणुकीची रणनीती आखण्याच्या अनुषंगाने ही नेतेमंडळी शुक्रवारी एकत्र बसण्याची शक्यता असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय खलबते होणार आहेत. आगामी निवडणुकीतील व्यूहरचना या बैठकांमध्ये आखली जाणार आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील हे प्रमुख संचालक एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे हे वार्षिक सभेत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचीही चर्चा होणार आहे. बँकेमध्ये गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा विभागातून पुन्हा उभे राहण्याची तयारी उदयनराजेंनी केली असून, महिला राखीव व अन्य एक संचालकपद मिळावे, यासाठी उदयनराजेंनी दबावतंत्र सुरू केले आहे.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने तीन जागांवर दावा केला आहे. त्यामुळे आगामी रणनीतीसाठी काँग्रेसच्या नेत्यांना बोलावले जाणार का? याबाबत राजकीय धुरीणांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून बँकेचे दिवंगत संचालक विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर यांना उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेस आग्रही आहे तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे याच मतदारसंघातून उमेदवारी करण्याच्या तयारीला लागले आहेत. आता या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? हेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
चौकट...
बँकेची आज ७१ वी सभा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २७ रोजी दुपारी १ वाजता बँकेच्या प्रशासकीय कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. बँकेला उच्चांकी करपूर्व ढोबळ नफा १३० कोटी ९९ लाख तर सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा ६५ कोटी रुपये इतका झालेला आहे. बँकेच्या ठेवींत भरघोस वाढ झाली असून बँकेने मार्च २०२१ अखेर रु. ८५७७ कोटी इतकी मजल गाठली आहे. याबाबतची माहिती बँकेतर्फे देण्यात आली आहे.
चौकट...
भाजपचे मनसुबे धुळीला...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीला पक्षीय रंग लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न सुरू ठेवले होते. मधल्या काळात कोरोनामुळे निवडणूक अनेकदा पुढे ढकलली गेली होती. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सत्ताधारी संचालकांनी पक्षविरहित आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले हेही या आघाडीत घेतले जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीने भाजपचे मनसुबे मोडून काढण्यात यश मिळविले असल्याची चर्चा सुरू आहे.