सातारा : राज्य शासनाच्या घोषणेनंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रविवारी जिल्ह्यातील कडक निर्बंधही शिथिल केले. काही सेवांना सोमवारपासून परवानगी दिली. हे आदेश रविवारी सोशल मीडियातून फिरत होते. माण, खटाव तालुक्यांतील व्यापारी सोमवारी सकाळी दुकाने उघडण्यासाठी बाहेर पडताच प्रांताधिकाऱ्यांनी पूर्वीचेच आदेश कायम ठेवल्याचे जाहीर केले. खटाव तालुक्यातील पन्नास गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले, तर म्हसवडमधील दुकाने बारानंतर बंद करण्यात आली.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या काही दिवसांपासून काही प्रमाणात कमी होत होती. राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून कडक निर्बंध शिथिल केल्याचे जाहीर केले. यामुळे पंधरा दिवसांपासून घरात बसून असलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. नागरिकांनीही खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
दरम्यान, खटाव तालुक्यात सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात तब्बल ३९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तालुक्यातील ५० गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी येत नसल्याने तालुक्यातील ५० गावे प्रतिबंधित म्हणून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी जाहीर केले.
त्याचप्रमाणे म्हसवड शहरातील दुकानदारांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी बारा वाजेपर्यंत उघडली; पण नंतर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून शहरात यापूर्वीचा कंटेन्मेंट झोनचा आदेश पूर्ववत ठेवल्याचे जाहीर केले. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली.
फोटो
०७सातारा०१
साताऱ्यातील कडक निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून शिथिल केले. पंधरा दिवसांपासून घरात अडकून पडलेल्या नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. (छाया : जावेद खान)