सातारा : शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. यामध्ये बियाण्यांसाठी जिल्ह्यातील ७४५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १८१ जणांनाच प्रमाणित अनुदानित बियाणे मिळणार आहेत. यामध्ये खटाव तालुक्यातील सर्वाधिक ५१ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. २५ मेपर्यंत बियाणे, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादन आदींसाठी जिल्ह्यातील ३९ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. यातील ७४५ शेतकऱ्यांनी प्रमाणित अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज भरले होते. त्यानंतर आॅनलॉईन पध्दतीने सोडत झाली. यामध्ये १८१ शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार आहेत.
या वर्षी कडधान्य बियाणे २५ व ५० रुपये प्रतिकिलो, संकरित मका व बाजरी १०० रुपये प्रतिकिलो, ज्वारी व बाजरी ३० व १५ रुपये प्रतिकिलो, सोयाबीन १२ रुपये किलो या दराने बियाणे मिळणार आहे. एका शेतकऱ्याला २ हेक्टरपर्यंत लाभ मिळणार आहे.
दरम्यान, शासनाने या वर्षी पोर्टल सुरू केले असून, अनेक शेतकऱ्यांना याची माहितीही नाही. तसेच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अर्जही भरता आले नाहीत. त्यामुळे बियाण्यांसाठी अर्ज कमी आल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकट :
अनुदानित बियाण्यांसाठी आलेले अर्ज ७४५
लॉटरी किती जणांना १८१
.................
चौकट :
तालुकानिहाय लाभार्थी संख्या
फलटण २१
कऱ्हाड १२
महाबळेश्वर १०
जावळी १६
खंडाळा १०
पाटण ३२
माण २६
खटाव ५१
.............
अर्ज करण्याची माहितीच नाही...
शासनाकडून अनुदानित बियाणे मिळतात. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो, याची माहिती नव्हती. त्यामुळे अर्ज करताच आला नाही. अनुदानित बियाण्यांबाबत ग्रामीण भागात जागृती होण्याची आणखी आवश्यकता आहे. तरच अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी
............................................
माॅन्सूनपूर्व पाऊस होत आहे. तरीही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. खरीप हंगामातील बियाण्यांसाठी शासनाच्या पोर्टलवर अर्ज केला होता. पण, अजून त्याबद्दल काही मेसेज आलेला नाही. त्यामुळे अनुदानावर बियाणे मिळणार का, याविषयी काही सांगता येत नाही.
- रामचंद्र पाटील, शेतकरी
.................................
खरीप हंगामासाठी पूर्वी तालुकास्तरावर बियाणे मिळत होते. आता पोर्टलवर अर्ज करावा लागतो. याबाबत मला उशिरा समजले. पण, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बाहेर जाऊन अर्ज करता आला नाही. त्यामुळे बियाणे बाहेरूनच विकत घ्यावे लागणार आहेत.
- किरण काळे, शेतकरी
............................................................