सातारा : केंद्र शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले असले तरी दरात अजून मोठ्या प्रमाणात उतार आलेला नाही. सोयाबीन तेलाचा दर टिकून असून, सूर्यफूल तेलाचा डब्यामागील दर सरासरी ५० रुपयांनी कमी झाला आहे, तर बाजार समितीत कांद्याचा दर स्थिर असून वाटाण्याचा वाढला आहे. तसेच कारली अन् दोडक्याला भाव कमीच असल्याचे दिसून आले.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४८५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली, तर कांद्याची १२५ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला, तर वांग्याला अजूनही दर कमीच मिळत आहे. वांग्याला १० किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ८० ते १०० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. दोन्ही भाज्यांचा भाव वाढला आहे. आल्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत, तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाला.
खाद्यतेल बाजारभाव...
तीन आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर स्थिर होता; पण सध्या सूर्यफूल तेलाचा दर थोडा कमी झाला आहे. सूर्यफूल तेल डब्याचा दर २३५० ते २४२० रुपये आहे, तर पामतेल २१५०, शेंगदाणा २३०० ते २४५० आणि सोयाबीन डबा २३०० ते २४०० पर्यंत मिळत आहे. तर पाऊचमध्ये सूर्यफूल तेलाचा १६० ते १७५, सोयाबीनचा १६० रुपयांपर्यंत दर आहे.
डाळिंबाची आवक...
बाजार समितीत सध्या डाळिंब, सीताफळ आणि पपई फळांची आवक बऱ्यापैकी होत आहे. रविवारी डाळिंबाची १० क्विंटलची आवक झाली.
गवारला भाव कमी...
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, गवारचा दर कमी झाला आहे. रविवारी १० किलोला अवघा १०० ते १२० रुपये भाव आला. शेवगा ३०० ते ४०० आणि बटाट्याला १० किलोला १३० ते १४० रुपये दर आला. वाटाण्याचा दर वाढला आहे. क्विंटलला सात हजार ते साडेआठ हजार दर आला.
प्रतिक्रिया...
लॉकडाऊनमुळळे पाश्चात्त्य देशात तेल उत्पादनावर परिणाम झाला आहे. केंद्राने आयात शुल्क कमी केले असले तरी दर अजून अपेक्षित कमी नाहीत. सूर्यफूलचा थोडा कमी आहे.
- संभाजी आगुंडे,
विक्री प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून भाज्यांचा भाव स्थिर आहे. तरीही कोणतीही भाजी ही ४० रुपयांच्या खाली नाही. वाटाणा १०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. कोबी, टोमॅटो आवाक्यात आहे.
- राधा पवार, ग्राहक
मागील काही दिवसांपासून भाज्यांना दर कमी आहे. कोबी, टोमॅटो आणि वांग्याला मिळणारा दर पाहता उत्पादन घ्यावे की नको असा प्रश्न पडत आहे. सध्या मात्र वाटाण्याला चांगला दर मिळत आहे. यामुळे थोडे समाधान वाटत आहे.
- गोरख पाटील, शेतकरी
..........................................................................................................................................................................................