कऱ्हाड : ग्रामीण भागातील एखाद्या कामाबद्दल, अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी गुपित स्वरूपात देता यावी, यासाठी कऱ्हाड पंचायत समितीमध्ये ‘तक्रार पेटी’ ठेवण्यात आली होती ती ‘तक्रार पेटी’ आता हरवली असून पेटीवरती सध्या एका विभागामध्ये खासगीत ‘उपचार’ केले जात असल्याचे बोलले जाते.कऱ्हाड तालुका कार्यक्षेत्रात येणाऱ्या १९८ गावातील सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या समजुन घेवून त्यावर योग्यप्रकारे तोडगा काढण्याच्या उद्देशाने पंचायत समिती प्रवेशद्वाराजवळ एका शासकीय विभागाच्या एका खिडकीवर तक्रार पेटी ठेवण्यात आली होती. मात्र, ही तक्रार पेटीच गायब झाली आहे. कऱ्हाड पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह इतर विभागाविषयी तक्रारी, समस्या गुप्तपणे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी समितीमध्ये ही तक्रार पेटी ठेवण्यात आली होती. ती अचानकपणे गायब झाली असल्याने तक्रार पेटी गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित होतोय. पंचायत समितीमध्ये अनेक महत्वाचे विभाग कार्यरत आहेत. आरोग्य, सामान्य प्रशासन, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, कृषि, शिक्षण आदी महत्वाच्या विभागासह इतरही विभाग येथे कार्यरत आहेत.याशिवाय दररोज मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून लोक शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती घेण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र, त्या-त्या विभागाचे साहेबच ‘कामा’साठी बाहेर गेले असल्यामुळे सामान्यांची त्यांच्याशी भेट होऊ शकत नाही. वारंवार सामान्यांना पंचायत समितीत हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे आपल्या अडचणी, तक्रारी कोणापुढे मांडायच्या हा प्रश्न प्रामुख्याने लोकांना पडतो.या हरवलेल्या तक्रार पेटीविषयी कुणाला काहीच माहिती नसल्याने या हरविलेल्या तक्रार पेटीची तक्रार कोण समजून घेणार हा यक्षयज्ञ प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी) ‘तक्रारी फक्त मासिक सभेतच’कऱ्हाड पंचायत समितीच्या मासिक आढावा सभेदरम्यान सदस्यांकडून तालुक्यातील सार्वजनिक योजना, प्रकल्प या कामातील निर्माण होणाऱ्या तक्रारी, समस्या, अडचणीे सदस्यांकडून मांडल्या जातात. त्यावेळी सदस्यांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून उत्तरे दिली जातात. मात्र, तक्रार पेटी हरवल्याने सामान्यांनी आपली तक्रार कोणापुढे मांडायची, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.
तक्रारी संपल्या की पेटी हरवली ?
By admin | Updated: January 20, 2015 23:34 IST