कोरेगाव : ‘राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे जनता पक्षाच्या पाठीशी उभी आहे. नुकत्याच
झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक
ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी कोण काय म्हणतो, यापेक्षा आकडेवारी पहा, मगच दावा करा,’ असा इशाराच आमदार
शशिकांत शिंदे यांनी दिला.
ल्हासुर्णे येथील निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती
राजाभाऊ जगदाळे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण माने, तालुकाध्यक्ष
भास्कर कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ४२ ग्रामपंचायतींवर आम्ही निर्विवाद वर्चस्व मिळवले
आहे, यात शंकाच नाही. काही ठिकाणी चिठ्ठी टाकल्याने तर काही
ठिकाणी अगदी नगण्य मते कमी पडल्याने पराभव स्वीकारावा लागला. तो आम्ही मान्य करतो. मात्र सर्वाधिक ग्रामपंचायती या आमच्या विचारांच्या
आहेत. त्यावर अन्य कोणीही अधिकार सांगू नये. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. युवा पिढी पक्षाच्या पाठीशी ठाम आहे, हे दिसून येत आहे. ल्हासुर्णे ग्रामपंचायत ही आमच्या विचारांची नव्हती, त्यामुळे तेथे
सत्तांतर झाले, हे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही तेथे महाविकास आघाडी म्हणून एकत्रितरित्या निवडणूक लढवली, मात्र तेथे अपयश आले. तिच परिस्थिती अन्य
काही गावांमध्ये पहावयास मिळाली. पाडळी स्टेशन अर्थात सातारारोडमध्ये शेवटच्या दोन दिवसांमध्ये आम्ही पॅनेल उभे केले त्यामुळे आम्हाला
अपयश आले आहे, मात्र आमच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. विधानसभा निवडणुकीची घमासान यावेळी पहावयास मिळाली.
आम्ही त्यावेळी गाफील होतो, यावेळी वेळीच सावध झाल्याने यश मिळाले.’
चौकट :
सातारा पालिका लढविण्यावर राष्ट्रवादी ठाम
सातारा शहराबरोबरच जिल्ह्याने राष्ट्रवादीला नेहमीच साथ दिली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पक्षबांधणीसाठी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विधान परिषदेवर संधी देत माझ्यावर
जबाबदारी सोपविली आहे. सातारा नगरपालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहे. पक्ष नेतृत्व ज्याप्रमाणे निर्णय घेईल, त्याप्रमाणे निवडणूक लढवली
जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट :
पक्ष संघटनेमध्ये लवकरच खांदेपालट
जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढत आहे. कोरेगाव मतदारसंघही त्याला अपवाद नाही. या मतदारसंघात लवकरच पक्ष संघटनेमध्ये खांदेपालट केला जाणार आहे. युवकांना संधी दिली जाणार आहे. स्थानिक
स्वराज्य संस्थांमध्ये निर्णय घ्यायचे झाल्यास पदाधिकारी व प्रमुख
कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.