वाई : वाई तालुक्यातील कुसगाव याठिकाणी सुरू करण्यात आलेला स्टोन क्रेशर बंद करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला लाँग मार्च रोखण्यासाठी व चर्चेतून मार्ग काढण्यासाठी वाई तालुक्याच्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांकडून संबंधित क्रशर व त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली. जोपर्यंत दगड खान व क्रशर परवाना रद्द करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत लाँग मार्च थांबवणार नाही, या स्वरूपाची माहिती आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना दिली.यावर तहसीलदार यांनी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला व कलेक्टर हे घरगुती अडचणींमुळे सोमवारपर्यंत रजेवर असल्यामुळे आपण आंदोलन थांबवावे. आपण सोमवारी कलेक्टर यांच्यासोबत चर्चा करून यावर मार्ग काढू व तोपर्यंत क्रशरच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या सर्व प्रक्रिया थांबवते. हे सर्व लिखित स्वरूपात देते, अशी माहिती आंदोलन करताना दिली. यावर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक होईपर्यंत क्रेशरमधील ब्लास्टिंग उत्खनन व कृषी त्याचबरोबर वाहतूक थांबविण्याचे लेखी पत्र द्या, आम्ही हे आंदोलन स्थगित करतो, अशी माहिती दिली.तहसीलदार यांनी त्याअनुषंगाने पत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि थोड्या वेळात त्यांचे प्रतिनिधी संबंधित पत्र घेऊन आंदोलन स्थळी पोहोचले. पत्र वाचल्यानंतर त्यामध्ये फक्त जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक नियोजित केल्याबद्दलच माहिती देण्यात आली. क्रशर ठिकाणी सुरू असणाऱ्या सर्व प्रक्रिया थांबविण्यासंबंधी कोणतीही माहिती त्या पत्रामध्ये देण्यात आली नाही. ही माहिती आंदोलनकर्त्यांना समजल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला. आंदोलनकर्ते यांनी तहसीलदार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करत लाँग मार्च मुंबईच्या दिशेने चालू ठेवला आहे.
Satara: कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात बोंबाबोंब आंदोलन, स्टोन क्रेशर विरोधात मुंबईच्या दिशेने लाँग मार्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:10 IST