Lok Sabha Election 2019 माढ्याचा निकाल फलटणला दिशा देणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:06 PM2019-04-24T23:06:10+5:302019-04-24T23:06:38+5:30

नसीर शिकलगार । लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : माढा लोकसभा मतदार संघासाठी फलटण विधानसभा मतदार संघातून ६३.५५ टक्के मतदान ...

Lok Sabha Election 2019 Results | Lok Sabha Election 2019 माढ्याचा निकाल फलटणला दिशा देणारा

Lok Sabha Election 2019 माढ्याचा निकाल फलटणला दिशा देणारा

Next

नसीर शिकलगार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : माढा लोकसभा मतदार संघासाठी फलटण विधानसभा मतदार संघातून ६३.५५ टक्के मतदान झाले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोघांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत कोण जिंकून येणार, यासाठी अनेकांनी पैजा लावल्या असून, फलटण तालुक्याचे आगामी राजकारण ठरविणारी ही निवडणूक भविष्यातील राजकरणासाठी निर्णायक ठरणार आहे.
फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची पूर्णपणे एक हाती सत्ता आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या अशा विधानसभा, नगरपालिका, पंचायत समिती, दूध संघ, बाजार समिती, बहुसंख्य ग्रामपंचायती आणि सोसायटी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी फलटण विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळेल, असे निवडणुकीपूर्वी बोलले जात होते. मात्र अनपेक्षितरीत्या कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळविली. फलटण तालुक्यातील स्थानिक उमेदवार हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. तालुक्याचे भूमिपुत्र असल्याने तालुक्यातून मोठे मताधिक्य द्या, अशी भावनिक साद रणजितसिंह यांनी घातल्याने आता मताधिक्य कोणाला मिळणार? यावर दोन्ही नाईक-निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालुक्यावर असलेली पकड कोणत्याही परिस्थितीत ढिली पडू द्यायची नाही, या हेतूने राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा हाती घेतली. रामराजे यांनी दररोज कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सर्वांना कामाला लावले. मतदारांनाही त्यांनी भावनिक साद घालून तालुक्यात दुसरे सत्ताकेंद्र होऊ देऊ नका, असे आवाहन केले, तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पूर्ण लोकसभा मतदार संघात फिरता यावे म्हणून त्यांच्या प्रचाराची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या जिजामाला, बंधू नगरसेवक समशेरसिंह, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, सह्याद्री कदम, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम यांनी राबविताना तालुका पिंजून काढला. आपला माणूस, आपल्या तालुक्याचा सुपुत्र खासदार होतोय, त्याला साथ द्या, असे भावनिक आवाहन सर्वांनी केले. रणजितसिंहांनी रामराजे यांच्यावर वैयक्तिक जास्त टीका न करता नीरा-देवघर कालव्याचे पाणी आणि रेल्वे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने बोलणे पसंत केले.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला किती मते मिळतात आणि ते कोणाची मते खातात, हेही दुर्लक्षित करून चालणार नाही. तालुक्यात दोन्ही नाईक-निंबाळकरांमध्ये चाललेली वर्चस्वाची लढाई कोण जिंकणार, हे २३ मे रोजी कळणार असले तरी तालुक्यातील जनतेला मताधिक्याची उत्सुकता लागली आहे. दोन्हीकडील कार्यकर्ते मताधिक्याचे वेगवेगळे आकडे मांडताना दिसत आहेत. अनेकांच्या पैजाही लागलेल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता असल्याने प्रतिष्ठेच्या या लढाईत कोण कोणाला मात देतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.