पुसेगाव : तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ४२ गावे व वाड्या-वस्त्यांवरील कोरोनाबाधित रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना केअर सेंटरला वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून चार दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे दोन लाखांहून जास्त रुपयांची मदत जमा झाली.
या भागातील पुसेगाव हे बाजारपेठेचे गाव असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचा सतत संपर्क पुसेगावात येत असतो. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गतवर्षापासून सुरू असलेल्या कोरोना केअर सेंटरमधून सुमारे सहा हजार रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र वर्षभरात येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपचारादरम्यान विविध वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेमुळे नेहमीच अडचण येत होती. या सेंटरला वैद्यकीय सेवेसाठी मदत व्हावी या हेतूने सोशल मीडियावर दि. ४ मे रोजी रात्री यथाशक्ती मदतीचे आवाहन केले.
दरम्यान, लोकवर्गणीबरोबरच आमदार शशिकांत शिंदे यांनी या कोरोना सेंटरची गरज ओळखून वीस के.व्ही.चा जनरेटर व विविध प्रकारची औषधे, तसेच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव व बांधकाम व्यावसायिक राजेश देशमुख, तसेच पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, सर्व सदस्य, तलाठी गणेश बोबडे, ग्रामविकास अधिकारी नाळे, ग्राम दक्षता समिती व ग्रामस्थ यांनी विविध माध्यमातून या सेंटरच्या वैद्यकीय गरजा पूर्ण केल्या. तसेच शासकीय विद्यानिकेतन येथे ३० बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे.
चौकट :
लोकसहभागातून जमा झालेल्या मदत निधीतून वैद्यकीय अधिकारी, ग्रामदक्षता समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते व सढळ हाताने मदत केलेल्यांच्या सर्वानुमते कोविड सेंटरमध्ये कार्डियाक मॉनिटर, मल्टी पॅरामीटर, सक्शन मशीन्स, ऑक्सिमीटर ही वैद्यकीय प्रशासनाला उपचारांसाठी आवश्यक अशी उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. गरज भासल्यास किमान तीन, चार ऑक्सिजन बेड्स याच सेंटरमध्ये तयार करण्यात येणार आहेत.
फोटो ०९पुसेगाव
पुसेगाव ता. खटाव येथील रत्नदीप दुर्गा मंडळाच्यावतीने कोरोना केअर सेंटरसाठी विकास जाधव यांनी मदत केली. यावेळी तलाठी गणेश बोबडे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, राजेश देशमुख, सुरेश जाधव, अभिजित जाधव उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)