पुसेगाव : ‘येत्या दोन वर्षांत या भागातून दुष्काळ हद्दपार करण्याचा आपण संकल्प केला असून, या भागाचा आमदार असेपर्यंत येथील जनतेला काहीही कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.राजापूर ( ता. खटाव ), येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारण कामाच्या पाहणी नंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी सरपंच हणमंतराव घनवट, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र कचरे, मंडल अधिकारी एस. के. पवार, ज्ञानेश्वर जगताप, विसापूरचे सरपंच सागर साळुंखे, नोकरदार-व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मारुतीराव घनवट आदी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘लोकसहभागातून बंधारे बांधण्याबरोबरच आपल्या भागातील सर्व ओढे व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम वर्षभरात पूर्ण करावयाचे आहे. कामाची व्याप्ती मोठी असल्याने या कामासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकवर्गणीच्या स्वरूपात जेवढा निधी ग्रामस्थ देतील तेवढा निधी वैयक्तिक स्वरूपात देणार आहे. यावर्षी पाणी टंचाईची दाहकता मोठी असली तरी मतदार संघातील जनतेला पाण्याबाबत कसलीही अडचण येऊ देणार नाही. सरकार देईल ना देईल मात्र मागेल त्या गावास टॅँकर देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून स्वीकारली आहे. येरळा पुनरुज्जीवन योजना माथा ते पायथा अशी राबविली जावी, अशी आपली आग्रही भूमिका असून, प्रसंगी याबाबत शासनाबरोबर संघर्ष करण्याची भूमिका घ्यावी लागेल,’ असे आमदार शिंदे यांनी सांगितले.अंकुश घनवट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. दशरथ घनवट यांनी आभार मानले. (वार्ताहर)ग्रामस्थांकडून मदतीचा हात राजापूर येथे सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामासाठी नाम फाउंडेशन व पाणी फाउंडेशन तर्फे ८५ हजारांचा धनादेश डॉ.अविनाश पोळ यांनी राजापूर सरपंचाकडे सुपूर्त केला. तसेच मुंबई हेल्प ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गार्डे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ एक लाख रुपये देणगी देऊन ट्रस्टच्या माध्यमातून दीड लाख रुपये खर्चाचा गाव ओढ्यावर सिमेंट बंधारा बांधण्याचे आश्वासन दिले. मुंबई येथे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या दत्ता घनवट या रिक्षा चालकाने कुटुंबासाठी राखून ठेवलेले पाच हजार रुपये जलसंधारणाच्या कामासाठी दिल्याने आमदार शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
दोन वर्षांत दुष्काळ हद्दपार करू
By admin | Updated: March 2, 2016 00:55 IST