चाफळ परिसरात बिबट्याची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:23 AM2021-07-22T04:23:57+5:302021-07-22T04:23:57+5:30

चाफळ : चाफळसह विभागातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. गत दहा दिवसांपासून ...

Leopard terror continues in Chafal area | चाफळ परिसरात बिबट्याची दहशत कायम

चाफळ परिसरात बिबट्याची दहशत कायम

Next

चाफळ : चाफळसह विभागातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. गत दहा दिवसांपासून बिबट्या पुन्हा पाळीव जनावरांवर हल्ले करू लागला आहे. जाधववाडी गावात घराशेजारी बांधलेल्या पाळीव श्वानावर हल्ला चढवून त्याला ठार मारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चाफळ परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

चाफळ विभागातील उत्तरमांड धरणाच्या परिसरात बिबट्या निदर्शनाला येऊ लागला आहे. दोन महिन्यांपासून या बिबट्याने जाधववाडी, पाडळोशी, वाघजाईवाडी, डेरवण, दाढोली, धायटी, खराडवाडी, कडववाडी गावांमध्ये पाळीव जनावरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या विभागाचे वनरक्षक अविनाश जाधव हे एखाद्या शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांवर खासगी क्षेत्रात बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यास त्याठिकाणी जाऊन तत्काळ पंचनामा करत आहेत. मात्र, असे असले तरी या बिबट्याचा बंदोबस्त करणार तरी कधी व कोण? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

पिंजरा लावल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून हा बिबट्या गायबही झाला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. यानंतर हाच बिबट्या सध्या जाधववाडी, शिंगणवाडी, डेरवण, गमेवाडी, कडववाडी, धायटी, पाडळोशी, जाळगेवाडी, माथणेवाडी गावच्या शिवारात नजरेस पडू लागला आहे, वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चाफळ परिसरातून होत आहे.

चौकट..

वन विभागाच्या उदासिनतेमुळे बिबट्याला पकडण्यात अपयश

चाफळ विभागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. गत वर्षभरात याच बिबट्याने जवळपास विभागातील तीस ते चाळीस पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे. मात्र, यातील किती लोकांना नुकसानभरपाई दिली गेली, हा संशोधनाचा विषय आहे. तर दुसरीकडे या बिबट्याला पकडण्यासाठी दीड वर्षापूर्वी वन विभागाने शिंगणवाडी याठिकाणी पिंजराही लावला होता; पण बिबट्या काही सापडला नाही. एकंदरीतच वन विभागाच्या उदासिनतेमुळे बिबट्याला पकडण्यात अपयश आल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Leopard terror continues in Chafal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.