म्हसवड : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, आणि कर्नाटक राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिध्दनाथ, देवी जोगेश्वरी देवस्थानच्या माण नदीपात्रातील पुरातन स्नानकुंड तीर्थाची दयनीय अवस्था झाली आहे. पालिकेने या तीर्थक्षेत्राचे विकास निधीतून बांधकाम करुन जीर्णोध्दार करावा, अशी मागणी येथील माणरत्न सोशल फाऊंडेशनतर्फे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी माणरत्न सोशल फाऊंडेशनचे लखन मंडले, सागर शिंदे, सुशांत तवटे, सद्दाम पटेल, विशाल नवगण उपस्थित होते.
येथील सिध्दनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूला माण गंगा नदीपात्रामध्ये सुमारे आठशे वर्षांपूर्वी दगडी बांधकाम केलेले पुरातन स्नानकुंड आहे. हे ठिकाण श्रींचे तीर्थ म्हणून सर्वपरिचित आहे. येथील श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक परंपरेनुसार श्रध्देने या तीर्थकुंडातील माण नदीच्या जलाने स्नान करुन मंदिरात दर्शनासाठी जातात.
या स्नानकुंडाचे पौराणिक महत्त्व असून, श्री सिध्दनाथ, देवी जोगेश्वरीसह अनेक देवदेवता प्राचीन काळापासून आजपर्यंत याठिकाणी स्नान करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच श्री सिध्दनाथ, देवी जोगेश्वरीचे पुत्र अग्निबाळ यांचा याठिकाणी वास असल्याचे सांगण्यात येते. सध्या या दगडी बांधकामातील स्नानकुंड तीर्थाची दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावत असून, या पुरातन वास्तूची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
माण नदीपात्रात सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम झाल्यामुळे तीर्थस्थळी पुरेसे पाणी उपलब्ध असते. तसेच या तीर्थानजीकच दगडी बांधकामातील हेळ आहे. त्यामध्ये वाळू व गाळ साचून ते नदीपात्रात पूर्णत: गाडले गेले आहे. या ऐतिहासिक हेळातील साचलेला गाळ व वाळू उपसा करुन त्याचीही दुरुस्ती करुन भाविकांसाठी वापरास खुले करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
फोटो -
म्हसवड येथील माण नदीपात्रातील श्री सिध्दनाथ देवस्थान मंदिराच्या स्नानकुंड तीर्थाची दुरवस्था झाली आहे. (छाया : सचिन मंगरुळे)
===Photopath===
040621\img-20210603-wa0079.jpg
===Caption===
पुरातन स्नानकुंड तिर्थाची पालिकेने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी