कऱ्हाड : चिकुन गुन्या आणि डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने विंग, ता. कऱ्हाड येथील २६४ घरांचा सर्व्हे केला. त्यामध्ये तेरा घरांतील फ्रीजमधील आउटलेट ट्रेमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे गावामध्ये निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. विंगमध्ये चिकुन गुन्या आणि डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. दोनशेहून अधिक जणांना त्रास होत असून, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावात दाखल झाले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांची स्वतंत्र सहा पथके तयार केली आहेत. या पथकांनी २६४ घरांतील १ हजार १२८ ग्रामस्थांची तपासणी केली.
प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा जलसमाधीचा इशारा
कऱ्हाड : तारळी धरण होऊन काही वर्षे लोटली तरी निवडे येथील पवार कुटुंबाला निवारा मिळू शकला नाही. शासनाने वेळोवेळी दिशाभूल केली असून, आता आम्ही तारळी धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा बनूताई पवार यांनी दिला आहे. त्याबाबतचे निवेदन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना संबंधित प्रकल्पग्रस्त कुटुंबाने दिले आहे. तारळी धरणांतर्गत असलेल्या निवडे गावचे संबंधित कुटुंब तोंडोशी येथील कृष्णा खोरेच्या शेडमध्ये राहाते. निवडे पुनर्वसित येथे आम्हाला भूखंड मिळावा म्हणून आजवर शासन दरबारी हेलपाटे घातले, मात्र कोणीही दाद देत नसल्याने आंदोलनाचा इशारा देत असल्याचे संबंधित कुटुंबाने निवेदनात म्हटले आहे.
शेरेकर विद्यालयाचे बारावीमध्ये यश
कऱ्हाड : शेरे, ता. कऱ्हाड येथील बाळासाहेब शेरेकर कृष्णा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेत साक्षी विश्वनाथ पवार, श्रुती रवींद्र निकम, वैष्णवी नामदेव निकम यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव ए. बी. पाटील, मुख्याध्यापक कांबिरे, बी. एस. पानवळ, एस. डी. जाधव यांच्यासह मान्यवरांनी सत्कार केला.
कऱ्हाड तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस
कऱ्हाड : तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असून, अधूनमधून हलक्या तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. सकाळी थोडाफार पाऊस पडत आहे. त्यानंतर दिवसभर पावसाची उघडीप राहत असून, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस पडत आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक आहे. सध्या शेतामधील पाण्याचा निचरा झाला असून, शेतकरी शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.