कऱ्हाड : ‘साखरेला पर्याय म्हणून देशभरात इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. याच धोरणाचा अवलंब करत येत्या काळात इथेनॉलनिर्मितीला अधिक प्राधान्य देण्याचा आमचा मानस आहे’, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारार्थ वारुंजी, पार्ले येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, बबनराव शिंदे, पैलवान आनंदराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोसले म्हणाले, ‘२०१५ मध्ये कृष्णा कारखान्याची सूत्रे हाती घेतली, तेव्हा कारखान्याची स्थिती फार बिकट होती. व्यापाऱ्यांची देणी, कामगारांचे पगार, तोडणी वाहतुकीचे पैसे द्यायलाही रक्कम उपलब्ध नव्हती. अशावेळी योग्य आर्थिक नियोजनातून कारखाना चालवून आम्ही कारखान्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. गेल्या ६ वर्षांत सरासरी तीन हजार रुपये दर, मोफत साखर, कामगारांना पगारवाढ असे अनेक लोकाभिमुख निर्णय घेत, शेतकरी सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले आहे.’
‘ येत्या काळात इथेनॉलनिर्मितीचे महत्त्व लक्षात घेऊन, २०१६ मध्ये दररोज ६० हजार लीटर क्षमतेचा इथेनॉलनिर्मिती प्रकल्प उभारला. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ८० हजार लीटरपर्यंत वाढवत नेऊन, या हंगामात दररोज १ लाख लीटर क्षमतेने हा प्रकल्प चालविला. यावर्षी १ कोटी लीटर इथेनॉल तयार केले असून, येत्या काळात हे उत्पादन अधिक वाढविण्याचा व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देण्याचा आमचा प्रयत्न राहील’, अशी ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.
फोटो ओळी :
पार्ले, ता. कऱ्हाड येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले कारखान्याच्या अवस्थेबाबत माहिती दिली.