लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप शुक्रवारी मागे घेण्यात आला. आमदार महेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे मतपरिवर्तन केले. सोमवारी बँकांचे कामकाज सुरु झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार केला जाणार आहे.
कोरेगाव नगरपंचायत कर्मचारी संघटनेने गुरुवारी रात्री उशिरा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. कोरोना केअर सेंटरच्या कामावर एकही कर्मचारी गेला नव्हता. कर्मचाऱ्यांच्या अडचणींविषयी राहुल प्र. बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर आमदार शिंदे यांनी संपाच्या ठिकाणी भेट दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट व मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यांनी तुमच्या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. सोमवारी बँकांचे कामकाज सुरु झाल्यानंतर एका महिन्याचा पगार केला जाणार आहे, त्यानंतर नगरपंचायतीचे आर्थिक नियोजन पाहून, दुसऱ्या महिन्याचा पगार दिला जाणार आहे. नगरपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करण्याचे नियोजन असून, शासनस्तरावर हा विषय आहे, नगरपालिका झाल्यास कर्मचाऱ्यांचा प्रश्न आपसूक सुटणार आहे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. लॉकडाऊननंतर त्वरित निर्णय होईल.
कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजित बर्गे, सूरज मदने, प्रताप बुधावले यांनी अडचणी विशद केल्या. मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी नगरपंचायतीची आर्थिक परिस्थिती विशद केली. आ. शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कर्मचारी संघटनेने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, राहुल प्र. बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक सुनील बर्गे, महेश बर्गे, जयवंत पवार, राहुल र. बर्गे, निवास मेरुकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
(चौकट)
८७ कर्मचाऱ्यांना किराणा सामान
आमदार महेश शिंदे यांनी ८७ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे किराणा सामान घरपोहोच करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.