आदर्की : फलटण तालुक्यात कोरोना रुग्ण वाढल्यानंतर प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय झाला अन् प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष सुरू झाल्याने ज्ञानमंदिरे कोरोना रुग्णाचे आधार केंद्र झाल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण तालुक्यात गतवर्षी कोरोना रुग्णाची संख्या निष्पन्न होताच गावबंदी, सीमाबंदी, रुग्ण रुग्णालयात किंवा गावाच्या बाहेर ठेवले जात होते. या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग ग्रामीण भागात सुरू झाला. त्या वेळी कोराेना रुग्ण निष्पन्न झाला की गृहविलगीकरण करण्यात आले. त्यामुळे पूर्ण कुंटुबे पॉझिटिव्ह येऊ लागल्याने खासगी दवाखाने हाऊसफुल्ल होऊन गावागावांत मृत्यूचे प्रमाण वाढले व आपलेच कार्यकर्ते गमावू लागल्याने राजकीय नेत्यांनी कोविड सेंटर सुरू केली. पण फलटण तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत राहिल्याने ब्रेक द चेन, लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन निर्बंध लादल्यानंतर जिल्हा परिषद गटनिहाय मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू केले. पण महिला, लहान मुले या रुग्णाची
गैरसोय होऊ नये, ग्रामपंचायत व लोकवर्गणीतून गावोगावी विलगीकरण कक्ष जिल्हा परिषद शाळेत सुरू झाल्याने ज्ञानमंदिरे कोरोनाबाधितांची आधार केंद्र बनल्याचे चित्र गावोगावी दिसत आहेत.