सातारा : रस्त्याच्या कामापोटी पोटठेकेदाराकडून बिलाच्या ३ टक्के रकमेची ६ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना खेड ता. सातारा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय ४८, रा.शाहूनगर, सातारा) असे ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे पोटठेकेदार आहे. तक्रारदार यांना मुख्य ठेकेदाराकडून रस्त्याचे काम मिळाले होते. त्यानुसार केलेल्या कामाचे ३ लाख ५० हजार रुपयांचे बिल झाले होते. बिल मंजूर करून त्याबाबतचा धनादेश दिला होता. मात्र खेड ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड याने धनादेशा्च्या मोबदल्यात ३ टक्के दराने पैशाची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्याने पोटठेकेदाराने लाचलुचपत विभागात याप्रकरणी तक्रार केली. लाचलुचपत विभागाने तक्रार घेतल्यानंतर त्याची पडताळणी केली असता ७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी झाली. मात्र तडजोडीअंती ती रक्कम ६,५०० रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम मंगळवारी घेण्याचे ठरल्यानंतर लाचलुचपतचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा लावला असता ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड याला साडेसहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनी केली.