कोरेगाव : पोलिस नव्हे मित्र, पोलिसापासून चार हात लांब राहावे... आदी पोलिसांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या अनेक म्हणी वर्षानूवर्षांपासून प्रचलित आहेत. पोलिस दल नसते तर आज समाजातील कायदा व सुव्यवस्था राहिली असती का? याचा विचार कोणी करत नाही; मात्र पोलिस हा देखील माणूस आहे, हेही तितकेच खरे आहे. सातारारोडमध्ये खाकी वर्दीतील माणुसकीने कोमात गेलेल्या वयोवृद्ध नागरिकाचा जीव वाचविला आणि त्याला एक प्रकारे पुनर्जन्म दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रकार शुक्रवारी आणि शनिवारी सातारारोडकरांना पाहावयास मिळाला. वयोवृद्ध नागरिकांच्या कुटुंबाने तर पोलिसांचे ऋण फेडू शकत नसल्याचे म्हटले आहे. सातारारोडमध्ये पोलिस दूरक्षेत्रामध्ये पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील हे प्रभारी असून, त्यांच्या जोडीला सात कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. पाटील हे कऱ्हाड तालुक्यातील ओंड-उंडाळे विभागातील रहिवासी. शुक्रवारी दिवसभरातील कामकाज आटोपल्यानंतर शनिवारच्या कामकाजाचे नियोजन उपनिरीक्षक पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत ठरवत होते, तेवढ्यात त्यांना एका पोलिस मित्राने एक वयोवृद्ध धनगर नागरिक दारूच्या नशेत बसस्थानकावर पडला असून, त्याची प्रकृत्ती योग्य वाटत नसल्याचे कळविले. त्यांनी तत्काळ पोलिस नाईक सनी आवटे, सचिन साळुंखे, बापूसाहेब ठोंबरे, विशाल पवार व एम. व्ही. कदम यांच्यासह बसस्थानकाकडे धाव घेतली. तेथे पाहतात तर एक जान विक्रेता वयोवृद्ध नागरिक बाकड्यावर झोपला आहे; मात्र त्याची हालचाल एकदम मंद होत चालली आहे. त्यांनी तेथील स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकाला पाचारण केले. त्याने प्राथमिक तपासणी केल्यावर ही व्यक्ती कोमात गेलेली आहे, ती अखेरच्या घटका मोजत आहे, असे सांगितले. केवळ काही तासांत तो जगाचा निरोप घेण्याची भीती व्यक्त केली. पाटील यांच्यातील माणूस जागा झाला, त्यांना चैन पडत नव्हती. पोलिस दलातील कामकाजाचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना वयोवृद्ध नागरिकाची तपासणी करण्यास सांगितले. त्याच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रांवरून भाऊ विठोबा बरकडे असे नाव समजले. माण तालुक्यातील टाकेवाडी हे गाव देखील माहीत पडले; मात्र पत्ता शोधणे रात्रीच्या वेळी अवघड, त्यात पहिल्यांदा जीव वाचविणे गरजेचे म्हणून त्यांनी शासनाच्या १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णाची प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे सांगितले. शासकीय रुग्णालयात नेऊन प्राण वाचविणे अशक्यप्राय होते. अखेरीस सातारा येथील खासगी स्पेशलिटी रुग्णालयात नेण्याचा निर्णय पाटील व सहकाऱ्यांनी घेतला, त्यासाठी त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला आणि त्यातील अडचणी दूर केल्या. रात्रीच्या वेळीच उपचार मिळाल्याने कोमात गेलेला हा रुग्ण चांगला बरा झाला आहे. तो आता बोलू लागला आहे. त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी माहिती दिल्याने ते देखील रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनीपोलिसांचे विशेषत: पाटील यांचे आभार मानले. (प्रतिनिधी) ..तर प्राण वाचले नसते ! भाऊ विठोबा बरकडे हे टाकेवाडी येथून धनगरी जान विक्रीसाठी खंडाळा-लोणंद परिसरात गेले होते. तेथून एकच जान शिल्लक राहिल्याने ते सातारारोडमध्ये आले. काही खाल्ले नसल्याने त्यांना कसेतरी वाटू लागले. त्यांनी बसस्थानकाचा रस्ता धरला आणि जान टाकून त्यावर झोपले. पोटात अन्नाचा तुकडा नसल्याने शरीर साथ देत नव्हते आणि अशक्तपणा वाढला. पोलिस मित्राने वेळीच पाहून पोलिसांना कळविले नसते तर बरकडे यांचे प्राण वाचले नसते. आता बरकडे हे व्यवस्थित बोलत असून, त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.
खाकी वर्दीतील माणुसकीने वाचविला एक जीव
By admin | Updated: August 1, 2016 00:47 IST