कऱ्हाड : शहरात वृक्षारोपणासह जुन्या तोडण्यात आलेल्या मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपणही केले आहे. त्यामुळे शहराची ‘ग्रीन सिटी’ अशी नवी ओळख होत आहे. गत सात वर्षांत किमान सहा हजारांपेक्षाही जास्त वृक्ष पालिकेच्या मदतीने स्वयंसेवी संस्थांनी लावली आहेत. वृक्षांच्या पुनर्रोपणासह नवीन झाडे लावल्याने बहुतांश भागात सावली देणारी झाडे पुढील काही वर्षांत दिसतील, अशी अपेक्षा आहे. शहरात लावलेली ८० टक्के झाडे जगली आहेत.
शहरातील वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी पालिकेने विशेष पुढाकार घेतल्याने त्या बाबी शक्य झाल्या आहेत. तोडलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा महत्त्वाचा निर्णय पालिकेने घेतला. त्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे झाली. शहरातील शुक्रवार पेठ, कृष्णानाका, कोल्हापूरनाका, कार्वेनाका येथील तोडलेल्या मोठ्या १५ वृक्षांचे नदीकाठासह स्मशानभूमी, ईदगाह मैदान परिसरात पुनर्रोपणही केले आहे. पालिका व स्वयंसेवी संस्थांनी राबविलेला हा उपक्रम यशस्वी झाला. २०१२ सालानंतर झालेल्या झाडांच्या तोडीमुळे पालिकेवर आरोप झाले होते. मात्र, गत तीन वर्षांपासून तोडलेल्या मोठ्या झाडांचे पुनर्रोपण झाल्याने पालिकेच्या ‘हरित क-हाड’ उपक्रमाला मोठा हातभार मिळाल्यासारखी स्थिती आहे.
शहरातील वृक्षगणना २०१२ मध्ये झाली. त्यावेळी शहरात विविध जातींच्या वृक्षांची नोंद केली गेली. अन्य वृक्षप्रेमींनी पुढाकार घेऊन अथक परिश्रमाने नोंदविलेल्या वृक्षांची संख्या चार हजारांच्या आसपास होती. त्याचा अहवाल पालिकेत आहे. पालिकेने वृक्षारोपणाचे उद्दिष्ट हाती घेतले. त्यानुसार आजपर्यंत या उद्दिष्टानुसार किमान सहा हजार वृक्षांचे रोपण झाले आहे. ईदगाह मैदान परिसरात किमान दोन हजार वृक्षांचे रोपण झाले आहे. त्याचे संगोपन, देखभाल व्यवस्थित होत आहे. याठिकाणी किमान १२ फुटांचे वृक्ष लावले आहेत.
- चौकट
ऑक्सिजन देणा-या वृक्षांची लागवड
क-हाड शहरात नव्याने झालेल्या पी.डी. पाटील उद्यानातही ऑक्सिजन देणा-या वृक्षांची संख्या जास्त आहे. तसेच कचरा डेपोच्या जागेतही मोठी बाग होणार आहे. तेथे तीन एकरांत पार्क उभारले जाणार आहे. पालिका त्या जागेत ऑक्सिजन देणारे वृक्ष लावणार आहे. त्यामुळे पार्कमध्ये वृक्षांची सावली असेल. ते वृक्ष आकर्षक पद्धतीने लावले जाणार आहेत. त्यामुळे तो भाग पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार आहे.
- चौकट
७५ एकर क्षेत्र बहरले
कऱ्हाड पालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेस सहकार्य व्हावे, यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये ईदगाह मैदानाच्या सुमारे ७५ एकर मोकळ्या जागेत ठिकठिकाणी सुमारे ७०० रोपांची लागवड करण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेतला गेला. त्यासाठी मैदानात खड्डे खोदून त्यामध्ये पालिकेकडून दिलेल्या वृक्षांचे रोपणही करण्यात आले. आज ते वृक्ष वाढले असून ट्रस्टसह पालिकेकडून त्यांची निगा राखली जात आहे.
- चौकट
दुभाजकांत फुलझाडे
कऱ्हाड शहर हे स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांतही आकर्षक फुलझाडे लावण्यात आली आहेत. कोल्हापूरनाका ते पोपटभाई पेट्रोलपंप, पोपटभाई पेट्रोलपंप चौक ते भेदा चौक, दत्त चौक ते विजय दिवस चौक, विजय दिवस चौक ते कृष्णानाका या मार्गांवरील दुभाजकांत वृक्षारोपण करण्यात आले आहे.
- चौकट
या रोपांची सर्वाधिक लागवड
१) गूळभेंडी
२) गुलमोहर
३) कदंब
४) टर्मिनल इंडिस
५) सप्तपर्णी
६) लिंब
७) आकाश लिंब
फोटो : २३केआरडी०६
कॅप्शन : कऱ्हाड येथे रस्त्याच्या दुभाजकांत मोठ्या प्रमाणावर फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दुभाजक बहरल्याचे दिसून येत आहे.