करंजे : सातारा शहरातील करंजे गावातील यात्रा वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोनाने सर्वच ठिकाणी संकटाची परिस्थिती निर्माण केलेली आहे. यातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन केलेला आहे. जमावबंदीचे आदेश लागू आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वजण एकजूट राहून विशेषतः आपण आपापल्या घरांमध्ये राहून कोरोनाला नेस्तनाबूत करावयाचा आहे. दि. ३ मे सोमवारपासून करंजे, सातारा
येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांची दरवर्षीप्रमाणे यात्रा होणार होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सामूहिक यात्रा रद्द करण्यात आली आहे. शासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग व समाजातील सर्व घटकांना सहकार्य करावे. या कालावधीमध्ये बाहेरच्या लोकांना, भाविकांना मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे कोणीही मंदिराकडे उत्सवाच्या निमित्ताने येण्याचा प्रयत्न करू नये, देवस्थानच्यावतीने तेथील पूजाअर्चा व धार्मिक विधी पुजारी करतील. कोणीही भाविकांनी अथवा करंजे ग्रामस्थांनी या ठिकाणचे मंदिरांमध्ये येऊ नये, नैवेद्य आणू नयेत, याचबरोबर कोणतीही मिरवणूक, पालखी सोहळा अथवा मानकरी अथवा सासनकाठ्या आणावयाच्या नाहीत. याचबरोबर श्री कालभैरवनाथ हे मंदिर भाविकांना बंद राहणार आहे.