सातारा : जामीन मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळला.पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार याप्रकरणात पुणे येथील एका महिलेने तक्रार दिली होती. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. तीन धनंजय लक्ष्मणराव निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.तक्रारदार महिलेच्या वडिलांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक झालेली आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यासाठी संशयितांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत करून जामीन अर्ज मंजूर करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्यासमोर शुक्रवारी सरकार पक्ष आणि बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. लाच मागणी प्रकरणातील ऑडिओ रेकाॅर्डिंगमध्ये घटनेचा उल्लेख आहे. आवाजाचे नमुने घेण्यासाठी न्यायाधीश धनंजय निकम यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे व इतर दोन आरोपींमध्ये मागील सहा महिन्यांत जवळपास ९ तास संभाषण झालेले आहे. त्यांचा मोबाइल जप्त करायचा आहे.न्यायाधीश हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते न्याय देतात. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील कुलकर्णी यांनी केला. तसेच बचाव पक्षाच्या वतीने ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
Satara: न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, लाच प्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:05 IST