कराड : जयसिंगपूर येथील एका कागद व्यापाऱ्याचे चौघांनी अपहरण करून चाकू व लाकडी दांडक्याचा धाक दाखवत तब्बल १५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी आरोपींनी व्यापाऱ्याकडील १० लाख ३६ हजार ७०० रुपये रोख व २ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना कराड तालुक्यातील पाचवड फाट्याजवळ कराड-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. निकेत श्रीभगवान बियाणी असे लुटलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी निकेत श्रीभगवान बियाणी (वय ४३, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी हे पेपर अँड पेपर प्रॉडक्ट्सचा व्यवसाय करतात. गुरुवार, दि. १८ रोजी ते चालक नवनाथ चोरमुले यांच्यासह (एमएच १२ यूएम २२००) वाहनाने साताऱ्याहून रक्कम घेऊन जयसिंगपूरकडे निघाले होते. कराड येथील व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन सायंकाळी ६ वाजता पाचवड फाट्यानजीक थांबून ते पुढे रवाना झाले.सायंकाळी ६:४० वाजता एका कारने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. रक्कम जवळ असल्याने न थांबता पुढे जात असताना, धडक दिलेल्या कारमधून खाली उतरत चार अनोळखी व्यक्तींनी बियाणी यांच्या गाडीत प्रवेश केला. त्यानंतर चालू गाडीत चाकू व दांडक्याने धमकावत बियाणी व चालकाला मारहाण केली. तसेच त्यांनी बियाणी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांना मित्र श्रेणिक घोडावत व भाऊ नितीन बियाणी यांना फोन करून ५ कोटी व १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर पुढे काही अंतरावर नेऊन त्यांना निर्जनस्थळी सोडली.
डिकीतील बॅगेत १० लाख ३५ हजार ७०० रुपये...पुढे आरोपींनी वाहनाच्या डिकीतील काळ्या रंगाची बॅग उघडून १० लाख ३५ हजार ७०० रुपये काढून घेतले, तसेच गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेतली. घटनेनंतर फिर्यादी व चालकाने दुसऱ्या दिवशी कराड येथे येऊन फिर्यादीने तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी...फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी शुभम व हरी अशी दोन नावे संभाषणात ऐकू आली असून, उर्वरित दोघांची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी अपहरण, दरोडा, खंडणी व मारहाण या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.
Web Summary : A Jaysingpur businessman was kidnapped near Satara and robbed of ₹10 lakh and a gold chain. The kidnappers initially demanded ₹15 crore ransom. Police are investigating using CCTV footage.
Web Summary : सतारा के पास जयसिंगपुर के एक व्यापारी का अपहरण कर ₹10 लाख और सोने की चेन लूट ली गई। अपहरणकर्ताओं ने शुरू में ₹15 करोड़ की फिरौती मांगी। पुलिस सीसीटीवी फुटेज से जांच कर रही है।