राजीव पिसाळ ल्ल पुसेसावळी माणसाची इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून गाढवं बोहल्यावर चढली. पाऊस पडावा म्हणून लग्न करण्याचा गाढवपणा खटाव तालुक्यातील दोन गाढवांनी केला; परंतु पाऊस पडल्यानंतर या लग्नातली माणसं गाढवांना पुरती विसरून गेली. लग्नाच्या दिवशी गोडधोड खाऊन मिरवणुकीत सजलेली ही दोन गाढवं आज भरपावसात ओझं उचलताना दिसली.सगळे प्रयत्न करून झाल्यानंतरही वरुणराजा काही प्रसन्न होईना, म्हणून वडगाव, ता. खटाव येथील ग्रामस्थांनी अखेर गाढवाचं पाय धरलं. गाढवाचं लग्न लावून पावसाला साकडं घातलं गेलं. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली अन् सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पण त्या गाढवांचा मात्र गावाला विसर पडल्याचे दिसत आहे.वडगाव, ता. खटाव येथे प्रत्येक वर्षी पाऊस पडावा म्हणून गाढवाचं लग्न लावण्याची रित आहे. पाऊस पडावा म्हणून लग्न लावण्यासाठी राजाचे कुर्ले, ता. खटाव यथील सुनील राजाराम पवार यांची गाढवं आणली होती. काम झाल्यानंतर ती मालकाला परत देण्यात आली, असे वडगाव येथील राजेंद्र जाधव यांनी सांगितले. रोज ओझं वाहून इमानेइतबारे काम करणाऱ्या गाढवांचा वापर माणसानं या कामासाठीही करून घेतला.राजाचे कुर्ले येथील सुनील पवार यांनी सांगितले की, गाढवांच्या जिवावरच आमचे कुटुंब चालते. कऱ्हाड येथे वीटभट्टीवर गाढवांच्या मदतीने माती ओतण्याचे काम करतो. सध्या कामाला विश्रांती म्हणून गावी आलो आहे. वडगाव ग्रामस्थांनी पावसासाठी आमच्या गाढवांचं लग्न लावलं. पाऊसही पडला, याचा आनंद झाला.
पाऊस पडला; पण लग्नातली माणसं गाढवांना विसरली
By admin | Updated: July 12, 2014 23:52 IST