लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुंबई - पुण्यासह बंगळुरूशी असलेली कनेक्टिव्हिटी, दळणवळणाच्या सुविधा, आरोग्यदायी वातावरण, सुरक्षितता असूनही सातारकरांसाठी आयटी हब अद्याप स्वप्नवत आहे. कॅपजेमिनी या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीला नुकतीच भेट दिल्याने येथे मोठ्या गुंतवणुकीची शक्यता वर्तविली जात आहे. टीअर २ आणि ३ शहरांमध्ये समावेश असूनही साताऱ्याकडे कंपनी वळविण्याकामी राजकीय इच्छाशक्तिचा अभाव दिसून येत आहे.
देशातील आयटी कंपन्यांची पुणे आणि मुंबई या महानगरांत वाढ होण्याला मर्यादा आल्याने टीअर २ आणि ३ शहरांमध्ये आयटी हब तयार करण्याची घोषणा ऑगस्ट महिन्यात माहिती तंत्रज्ञान आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. यात साताऱ्यासह अमरावती, नागपूर, लातूर आणि नांदेड या शहरांचा समावेश आहे. टीअर शहरांच्या यादीत साताऱ्याचा समावेश झाल्याने येथे आयटी हबच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
''कॅपजेमिनी'' या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी बारामती, कर्जत - जामखेड, नगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये आयटी सेंटर सुरू करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेत टीअर २मध्ये असलेल्या साताऱ्याचा नामोल्लेखही झाला नाही. एका बाजुला आयटी क्षेत्राच्या वाढीसाठी पायघड्या टाकल्या जात असताना साताऱ्यात मात्र राजकीय आघाडीवर उदासिनता, दुर्लक्ष, बेफिकीरपणा दिसून येत आहे. मग नेते काय केवळ जयजयकाराच्या घोषणांसाठीच का? असा उद्वेगपूर्ण सवाल सुशिक्षित बेरोजगार आणि पुणे-मुंबई स्थित सातारकरांतून व्यक्त होत आहे.