प्रमोद सुकरे
कराड - एकाच कुटुंबातील अन एकाच राष्ट्रवादीत दिसणारे पण एकमेकांचे विरोधक म्हणून ओळख असणारे अँड. उदयसिंह पाटील व अँड. आनंदराव पाटील हे उंडाळकर बंधू शनिवारी दि.१२ रोजी उंडाळ्यातील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले. राष्ट्रवादीचे नेते खासदार नितीन पाटील यांच्या दोन्ही बाजूला हे दोन्ही बंधू बसले होते. सोबत उदयसिंह पाटलांचे पुत्र आदिराज पाटीलही होते. त्यामुळे एकाच व्यासपीठावर दिसणारे हे दोन्ही बंधू आता भविष्यातील राजकारणात पण एक दिसणार का? याबाबतच्या उलट सुलट चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सलग ७ वेळा नेतृत्व करणारे आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर प्रदिर्घ काळ पकड ठेवणारे नेतृत्व म्हणून माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील यांचा उल्लेख करावा लागतो. पण आज याच परिवारातील उत्तराधिकार्यांना राजकीय पटलावर बराच संघर्ष करावा लागत आहे. राजकीय महत्त्वकांक्षीपोटी याच कुटुंबातील रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील व उंडाळे ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. आनंदराव पाटील या दोन चुलत बंधूंच्यात दरी पडली आहे.पुढे अँड.आनंदराव पाटील यांनी अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधत आपला प्रवास सुरू केला. जिल्हा परिषद, शामराव पाटील पतसंस्था आणि रयत सहकारी साखर कारखाना निवडणुकीत या बंधूमधील दरी आणखी वाढत गेली हा इतिहास आहे.
खरंतर एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसमध्येच विलासराव पाटील उंडाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असे दोन कार्यरत होते.पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र उंडाळकर गटाला बराच त्रास सहन करावा लागला. नंतर 'पृथ्वीराजा'नी विधानसभाही जिंकली. पुलाखालून बरेच पाणी निघून गेल्यानंतर या दोघांच्यात समझोता झाला. हे दोन्ही गट एकत्रित काम करू लागले. मात्र हे दोन्ही गट एकत्रित काम करत असताना देखील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपचे 'कमळ' फुलले ही वस्तुस्थिती आहे.
बदलत्या राजकीय घडामोडींचा अभ्यास करत अँड. उदयसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणे पसंद केले. आता दोन उंडाळकर बंधू एकाच राष्ट्रवादीत कार्यरत असून ते मनाने एकत्र होणार का? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली असेल तर नवल वाटायला नको. त्यातच शनिवारी हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने या चर्चांना जोर आला आहे.
कानमंत्र आणि कानपिचक्या
या कार्यक्रमात बोलताना खासदार नितीन पाटील म्हणाले, राजकारणात काहीही मागून मिळत नाही. त्यासाठी नशीब सुद्धा असावे लागते. आम्ही तिघे भाऊ आहोत. पण मकरंद पाटील यांना राजकीय आवड असल्याने आम्ही दोघा भावांनी त्यांना पाठिंबा दिला. आम्ही भांडत बसलो नाही. आज राजकीय परिस्थिती बिकट आहे. भांडत बसण्यापेक्षा एकत्र राहून काम केले तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल. तुम्ही दोघांनी एकत्रित काम करा तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल.उपमुखमंत्री अजित पवारही चांगली ताकद देतील असं त्यांनी सांगितले.
लोकांच्या मनातही हेच आहे ..
शामराव पाटील पतसंस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी अध्यक्ष बळवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले.आज अँड.उदयसिंह पाटील व अँड.आनंदराव पाटील हे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे समाधान वाटते. लोकांच्या मनातही हेच आहे असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याला प्रतिसाद दिला.
भाषणात परस्परांचा उल्लेख
कार्यक्रमात खासदार नितीन पाटील यांच्याबरोबरच अँड. उदयसिंह पाटील व अँड.आनंदराव पाटील या दोघांचीही मनोगते झाली. भाषण करताना दोघांनीही एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख केला. त्यावेळीही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.