शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी असणाऱ्या साईचैतन्य हाॅटेल याठिकाणी मेडिकलचे बेकायदेशीररीत्या साठवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिरवळसह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा साठा हा अंदाजे १३ लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ (ता. खंडाळा) येथील पंढरपूर फाट्यावरील साईचैतन्य हाॅटेलवर बेकायदेशीररीत्या मेडिकलचे साहित्य ठेवण्यात आल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांना मिळाली. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली असता त्याठिकाणी हाॅटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका रुममध्ये मेडिकलकरिता लागणारे साहित्यांची साठवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार हाॅटेलमधील मेडिकलचे साहित्य शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. याबाबत अन्न व भेसळ विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सागर अरगडे यांनी भेट दिली.
-
चौकट-
कारवाईवरून शाब्दिक चकमक..
शिरवळ येथे मेडिकल साहित्य असल्याचे आढळल्यानंतर शिरवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महेश इंगळे हे माहिती घेत असताना अनुप सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता कारवाईवरून सूर्यवंशी व महेश इंगळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, वृषाली देसाई यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.