सातारा : अनेक वर्षांपासून फक्त कल्पनेत असणाऱ्या योजना वास्तवात आणण्याचे काम सातारा विकास आघाडीने केले आहे. त्यामुळे साविआ, नगराध्यक्षा माधवी कदम व नगरसेवक वसंत लेवे हे अभिनंदनास पात्र आहेत; परंतु बेलगाम, बेताल वक्तव्य करून, जर काेणी गैरसमज निर्माण करीत असेल, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ,’ असा टोला उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी विरोधी पक्षनेता अशोक मोने यांना लगावला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कास धरण, कासची बंदीस्त पाईपलाईन, घनकचरा व्यवस्थापन, भुयारी गटर योजना, ग्रेडसेपरेटर, नवीन प्रशासकीय इमारत, पंतप्रधान आवास योजना, बागांचे नूतनीकरण, हद्दवाढ, मेडिकल कॉलेज, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र आदी स्वप्नवत वाटणारी विकासकामे सातारा विकास आघाडीने वास्तवात साकारुन लोकार्पण केलेली आहेत. नागरिक ही विकास कामे उपभोगत आहेत. त्याचे सर्व श्रेय सर्वसामान्य जनतेला म्हणजेच लोकशाहीतील राजांना जाते. त्यामुळे सातारा विकास आघाडी, नगराध्यक्षा माधवी कदम व वसंत लेवे हे अभिनंदनास पात्रच आहे. अशोक मोने यांनी केलेल्या अभिनंदनाबाबत त्यांना धन्यवाद देतो.
भ्रष्टाचार झाला असेल, तर पुरावे द्या. शहानिशा करू, असे नगराध्यक्षांचे म्हणणे आहे, ते रास्त आहे. सातारा नगरपरिषद ही शहराची मातृसंस्था आहे. नगरसेवक हे विश्वस्त आहेत. जर कोणत्याही आघाडीचा नगरसेवक पुराव्याशिवाय आरोप करीत असेल आणि नगरपरिषदेची बदनामी होत असेल, तर त्याचा समाचार नगराध्यक्षांनी घेतला, ते योग्यच आहे.
भ्रष्टाचाराबाबत सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीच आवाज उठवलेला आहे. त्यांनी भ्रष्टाचार कधीही खपवून घेतलेला नाही. भ्रष्टाचाराचे संस्कारातच तुम्ही वावरल्याने, तुम्हाला त्याच शब्दांचा आधार घ्यावा लागतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या नगरसेवक अशोक मोने यांनी बुध्दिभेद करून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये. केल्यास त्याच भाषेत उत्तर देण्याची कुवत सातारा विकास आघाडीमध्ये आहे,’ असा टोलाही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लगावला आहे.