खटाव : ‘हाय रिस्कमधील एकही व्यक्ती कोरोनाची टेस्ट न करता राहता कामा नये. कोरोनाबाधित व्यक्ती घरात राहता कामा नये, यांची जबाबदारी आरोग्य विभागाबरोबरच सर्व विभागांनी मिळून वज्रमूठ बांधल्याशिवाय कोरोनामुक्त गाव होऊ शकणार नाही,’ असे प्रतिपादन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले.
खटाव येथील ग्रामपंचायत सभागृहात कोरोनासंदर्भात आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, ग्राम दक्षता कमिटी सदस्य, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्याकडून केलेल्या कामाचा आढावा तसेच कोरोनाच्या रुग्णांसंदर्भात राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना यांची माहिती घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, राहुल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, डॉ. पराग रणदिवे, दीपक घाडगे, राहुल जमदाडे, संगीता काकडे, ग्रामसेवक विकास चव्हाण, तलाठी धनंजय तडवळेकर, अप्पासाहेब गौंड उपस्थित होते.
कासार म्हणाले, ‘रोजच्या रोज रुग्णांच्या नावासह माहिती ग्रामदक्षता समितीला देणे बंधनकारक आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले पाहिजे. त्याशिवाय शंभर टक्के चाचणी परिपूर्ण होणार नाही. प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे हाय रिस्कचे रुग्ण विलगीकरण सेंटरमध्येच पाठवणे गरजेचे आहे.
चौकट :
आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णाची माहिती, निश्चित आकडेवारी उपलब्ध न झाल्यामुळे कासार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच यंत्रणेने जबाबदारीने काम करण्याची तसेच योग्य व अचूक माहिती येत्या दोन दिवसांत तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाने कोरोनाच्या टेस्ट वाढवाव्यात. जे शिक्षक कामात हलगर्जीपणा करतील, टाळाटाळ करतील त्यांना नोटीस देऊन त्यांचा त्या दिवसाचा पगार कट करण्यात येईल, असा स्पष्ट शब्दांत इशारा दिला.
गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी विलगीकरण सेंटरमध्ये दाखल रुग्णांना गरम पाणी, पिण्याचे पाणी, गादी, मच्छरदाणी, विजेची सोय तातडीने ग्रामपंचायतीने करण्यासाठी सांगण्यात आले.