सदाशिव खांडके
ग्रामसेवक प्रोफाईल सदाशिव खांडके
शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी वैचारिक दृष्टिकोन आणि सगळ्यांना सोबत घेण्याची वृत्ती असेल तर गावचा ग्रामविकास अधिकारी देखील मोठे काम करून दाखवू शकतो. कऱ्हाड तालुक्यातील वराडे आणि घोनशी या दोन ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळत असलेले ग्राम विकास अधिकारी सदाशिव खांडके यांनी ग्राम विकासाचा आदर्श पाया रचला आहे.
वराडे आणि घोनशी या दोन्ही गावांमध्ये १४ वा वित्त आयोग तसेच १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले तर दोन्ही गावांमध्ये वृक्षलागवडीचा बिहार पॅटर्न राबवून गावे हिरवीगार केली आहेत. सदाशिव खांडके यांचा जीवन प्रवास कसा खडतरच होता. वडील एका व्यापाऱ्याकडे दिवानजी म्हणून काम करत होते. अतिशय संघर्षातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. दहावीपर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी हायस्कूल तारळे येथे शिक्षण घेतले तिथून पुढे बोरगाव येथील महात्मा फुले कृषी कोर्ससाठी ते दाखल झाले दोन वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
२१ ऑक्टोबर १९९४ मध्ये ते ग्रामसेवक म्हणून रुजू झाले. पहिल्याच वेळी त्यांच्याकडे करंजोशी, बोपोशी, जांभे, मोरेवाडी या सातारा तालुक्यातील दुर्गम भागातील चार गावांचा कार्यभार होता. तेव्हाच तारळी धरणाचे काम वेगाने सुरू होते. या धरणांमध्ये करंजोशी, बोपोशी ही दोन गावे बाधित ठरली. या दोन्ही गावांचे पुनर्वसनाचे काम खांडके यांनी अभ्यासपूर्ण रित्या केले, त्यानंतर त्यांच्याकडे सासपडे आणि गणेशवाडी या दोन गावांचा कार्यभार होता. २००० साली त्यांची बदली सातारा तालुक्यातून कऱ्हाड तालुक्यात झाली. कार्वे, शेनोली, जखिनवाडी, नांदलापूर, कोयना वसाहत याठिकाणी त्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सक्रिय सहभागातून आदर्श काम करून दाखवले.
जखिनवाडी या गावाला आदर्श चेहरा देण्याचे काम त्यांनी केले. सरपंच ॲड. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावाने मोठी गरुड झेप घेतली. प्रख्यात क्रिकेटर खासदार सचिन तेंदुलकर याने या गावा विषयाची ख्याती ऐकून तब्बल १ कोटी २७ लाख रुपयांचा फंड त्या गावाला दिला. हे गाव सौर ग्राम करण्यात खांडके यांना यश आले २०१० साली त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला. याच काळात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम हा पुणे विभाग स्तरावरचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
खांडके यांनी कोळेवाडी, तारुख,वानरवाडी येथेही चांगल्या पद्धतीने काम केले. शिंदेवाडी येथे काम करत असताना त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या ठिकाणी बांधून घेतले. पाणी आडवा पाणी जिरवाचा उपक्रम राबवला त्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. शासनाच्या विविध योजना रमाई घरकूल, यशवंत घरकूल, प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये त्यांनी आघाडीने काम केले तसेच कर वसुलीचे काम देखील त्यांनी उत्तम पद्धतीने केले. सर्वच ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांनी खांडगे यांच्या कामाला प्रोत्साहन दिले तसेच आदर्श काम करण्याची बळ देखील दिले.
इंद्रजित देशमुख यांच्या चळवळीत क्रियाशील काम
सदाशिव खांडके हे निर्व्यसनी आहेत. माजी सनदी अधिकारी व प्रख्यात विचारवंत इंद्रजीत देशमुख यांच्या ‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना’ या चळवळीत खांडके यांनी क्रियाशील काम सुरू ठेवले आहे. कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर जे लोक कोरोनाबाधित सापडले त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय त्यांनी केली. त्यांच्या कुटुंबाला सहारा दिला, त्यांच्या गोठ्यातील जनावरांना पाणी आणि चारा घातला. वेळप्रसंगी जनावरांच्या धारा देखील काढून त्यांनी या बाधित कुटुंबीयांच्या मदतीसाठी धाव घेतली.