सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण व परिसरात मागील आठवड्यापासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे तीन दिवसात धरणात साडेचार टीएमसीने पाणीसाठा वाढला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ९९.६३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यासाठी अजूनही सवापाच टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, तर यंदा धरण भरण्यास उशीर लागणार आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस पडला होता. त्यावेळी पश्चिम भागात तर धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत बनले होते. रस्ते वाहून गेले होते, तसेच जमिनी तुटल्या होत्या. हा पाऊस लोकांवर काळ बनून आला होता. अवघ्या तीन दिवसात कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस पडला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली. कोयना धरणात २४ तासात १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढलेले. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरलीच नाहीत. तसेच पूर्वेकडे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना ? अशी भीती व्यक्त होत होती. पण, गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्व भागातही चांगला पाऊस होत आहे. एक महिन्यानंतर प्रथमच चांगला पाऊस होत असल्याने पिकांना फायदा झाला आहे, तर पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, वाई, जावळी तालुक्यांतही पावसाची हजेरी आहे. यामुळे पिकांना फायदा झाला. त्याचबरोबर माण, खटाव तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यांत पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.
चौकट :
महाबळेश्वरला ४५ मिलिमीटर पाऊस...
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे ४२ मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ३८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच नवजा येथे २७ आणि आतापर्यंत ५१४५ व महाबळेश्वरला ४५, तर यावर्षी आतापर्यंत ५१४६ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २९६२८ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक स्थिर आहे. त्याचबरोबर धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे.
............................................................