पळशी : माण तालुक्यातील मार्डी येथील कोंडीपोळ वस्तीशेजारील मोरे डोंगरावर आठ ते दहा हेक्टर क्षेत्रामध्ये खैर, शिसम, करंज, बाभूळ या वृक्षांच्या बियांचे पाणी फाऊंडेशने व कोंडीपोळवस्ती येथील मुलांनी पर्यावरणदिनाचे औचित्य साधून नुकतेच बीजारोपण केले. त्यामुळे भविष्यात हा डोंगर वनराईने नटून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.
सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात बदल होत आहेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, प्रदूषण या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, ही गरज ओळखून मार्डी येथील तरुण एकत्र आले व त्यांनी परिसरातील बोडक्या आणि मोकळ्या डोंगरावर तसेच रिकाम्या जागेवर देशी वृक्षांच्या बीजारोपणास सुरुवात केली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने जमिनीस चांगली ओल आली आहे. त्यामुळे पाणी फाउंडेशन व परिसरातील तरुणांनी डोंगरावर बीजारोपण करण्याचे ठरवले.
येथील यशवंत चव्हाण, चंद्रकांत पोळ, मोहन पाटोळे, आबासाहेब पोळ, गणेश पवार, सुकृत सावंत, बापूराव पोळ, सुहास पोळ, सागर जळक, चैतन्य पोळ, सौरभ शिंदे, प्रथमेश पोळ आदींनी खैर, शिसम, करंज, बाभूळ अशा देशी वृक्षांच्या बिया गोळा करून बीजारोपण केले. त्यांनी जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे.
(चौकट)
अनेक वृक्षांचे बीजारोपण...
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरातील डोंगरावर रात्रीच्या सुमारास आग लागून आठ ते दहा हेक्टर वनसंपदेचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी येथील तरुणांनी मोठ्या शर्थीने ती आग विझविली होती. आगीत नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणात येथे बीजारोपण करण्यात आले आहे.
०४पळशी
मार्डी (ता. माण) तेथील डोंगरावर पाणी फाउंडेशन व तरुणांच्या मदतीने बीजारोपण करण्यात आले. (छाया : शरद देवकुळे)