कऱ्हाड : भिक्षुकांसह अनेक निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळाला असून, त्यांना प्रतिमहा एक हजार रुपयांची हक्काची पेन्शन मंजूर झाली आहे. त्यामुळे रस्त्यात भिक्षा मागणाऱ्यांसह निराधार म्हणून आयुष्य जगणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना कालावधीत अनेकांची अन्नान्न दशा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी निराधारांना आधार देण्याच्या उद्देशाने शहरासह परिसरातील निराधारांचे सर्वेक्षण केले. अनेक निराधारांची त्यांनी माहिती मिळवली. त्यावेळी काहीजणांकडे स्वत:चे आधारकार्ड, रेशनकार्ड नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधितांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागली. सुरुवातीला विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत बाबुराव बापू पवार, सिंधुताई बाबुराव पवार, हमिदा सादिक पटेल, शहजाद शमसुद्दीन शेख यांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना यांचा प्रतिमहा एक हजार रुपये लाभ मिळाला. सुरुवातीलाच न्या. औटी यांच्या कामाला यश आल्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुन्हा एकदा सहकाऱ्यांसमवेत सर्वेक्षणाचे काम वाढवून सुमारे दीडशेजणांची यादी बनवली. त्यामधील आजअखेर ४८ जणांना श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना यांचा लाभ मिळाला असून, प्रतिमहा एक हजार रुपयांची हक्काची पेन्शन मंजूर झाली आहे.
तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी न्या. औटी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांबाबत शासन दरबारी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यास परिश्रम घेतले. त्यांना नायब तहसीलदार तांबे, अव्वल कारकून साळुंखे यांनी सहकार्य केले.
- चौकट (फोटो : ०३एस. ए. ए. आर. औटी)
कोरोना कालावधीत कऱ्हाड तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. गरजूंना अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. निराधारांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. विधी सेवा समितीचे समन्वयक अनंत लादे, विधी सेवा प्रतिनिधी प्रणव काटू यांचे त्यासाठी विशेष सहकार्य लाभले.
- एस. ए. ए. आर. औटी
जिल्हा न्यायाधीश, कऱ्हाड
- चौकट
लाभार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले
दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन्हातान्हात एक-दोन रुपयांची भीक मागणाऱ्या काही भिक्षुकांना यापुढे सरकारकडून हक्काचे एक हजार रुपयांचे प्रत्येक महिन्याला अनुदान मिळणार आहे, हे समजताच त्यांचा यावर विश्वास बसला नाही. मात्र, सरकारने कोरोना कालावधीत दोन महिन्यांचे आगाऊ निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्येकाच्या खात्यात सुरुवातीला दोन हजार रुपये जमा होतील, असे न्या. औटी यांनी सांगताच अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.