शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हद्दीतील चौपाळा येथे खासगी कंपनीत जाण्यासाठी रस्ता दुभाजकांमधून महामार्ग ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला मालट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये पादचारी महिला जागीच ठार झाली. सुरेखा बाळकृष्ण घोडके (वय ४९, रा. हरिश्चंद्री, कापूरव्होळ, ता. भोर, जि. पुणे) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरिश्चंद्री येथील सुरेखा घोडके या शिरवळ येथील एका कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी सकाळी आठच्यादरम्यान कंपनीमध्ये जाण्याकरिता शिरवळ येथील चौपाळा याठिकाणी एका वाहनामधून सुरेखा घोडके उतरल्यानंतर रस्ता दुभाजकामधून महामार्ग ओलांडत होत्या. याचवेळी पुणेच्या बाजूकडून भरधाव आलेल्या मालट्रक (एमएच १२ क्यूडब्ल्यू ३१९४) ने जोरदार धडक दिली. त्यानंतर सुरेखा घोडके या महामार्गावर पडत मालट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने मालट्रकचे चाक डोक्यावरून गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी होत जागीच ठार झाल्या. यावेळी सुरेखा घोडके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शिरवळ पोलिसांनी मालट्रक चालक सुभाष विक्रम सोनावणे (रा. देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे. यावेळी अपघातानंतर बघ्यांनी गर्दी केल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी बघ्यांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण व गर्दी केल्याने पोलिसांना मदतकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.
चौकट
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हद्दीमध्ये चौपाळा येथील अपघाताला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्राचा गलथान कारभार कारणीभूत असून, साधारणपणे २००३ पासून याठिकाणी अपूर्णावस्थेमध्ये असणाऱ्या पुलामुळे व याठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना महामार्गावरून रस्ता ओलांडावा लागत आहे. याठिकाणी ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही महामार्गाचे काम संबंधितांनी अद्यापही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे अपघाताला दोषी धरून संबंधितांवर शिरवळ पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिरवळ व धागारवाडी ग्रामस्थांनी केली आहे.