कऱ्हाड : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असतानाही अनेकांना अद्याप शहाणपण सुचलेले नाही. मास्क, सॅनिटायझर वापरासह सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्याने पालन होत नाही. परिणामी, संक्रमण रोखण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. कऱ्हाड शहरासह तालुक्यात आतापर्यंत अडीच हजारांवर नागरिक ‘कोरोना स्प्रेडर’ ठरले असून त्यांच्यावर कारवाई करून प्रशासनाने लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
गतवर्षी मार्च महिनाअखेरीस जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. टप्प्याटप्प्याने कोरोना संक्रमण वाढले. सुरुवातीच्या कालावधीत हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बाधित रुग्ण आढळून येत होते. मात्र, कालांतराने रुग्णांचे प्रमाण वाढले. गतवर्षी मे आणि जून महिन्यात शेकडो कोरोना बाधित आढळून आले होते. संक्रमणाचा वेग वाढत असतानाच प्रशासनाने विविध उपाययोजनांद्वारे संसर्ग थोपविण्याचा प्रयत्न सुरू केला. लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी, सॅनिटायझर वापर, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर आदी उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या. त्यामुळे एकमेकांशी संपर्क येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होऊन बाजारपेठा उघडल्या. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली आणि सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांच्या उल्लंघनाचा प्रश्न निर्माण झाला.
गत काही महिन्यांत कोरोना संक्रमण आटोक्यात होते. बाधितांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होती. तसेच सक्रिय रुग्णांचे प्रमाणही अल्प होते. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध हटविले. मात्र, कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश कायम होते. अशातच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारावर आहे. मात्र, तरीही कोरोना नियमांबाबत नागरिकांमध्ये म्हणावे तेवढे गांभीर्य दिसत नाही. संक्रमण रोखण्यात मास्क प्रभावी असूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून मास्क वापराचा केवळ दिखावा करीत आहेत. नाक, तोंड रिकामे ठेवून मास्क केवळ दिखाव्यासाठी गळ्यात अडकविण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा कोरोना स्प्रेडर नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईही सुरू आहे.
- चौकट
जनजागृतीचाही फरक पडेना
जनजागृती करूनही मास्क वापराबाबत नागरिकांमध्ये म्हणावे तेवढे गांभीर्य नसल्यामुळे मास्क न वापरणारांना दंड करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. ग्रामपंचायतींसह स्थानिक प्रशासन ही कारवाई करीत आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारीही अशी कारवाई करून वसूल केलेला दंड संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा करीत आहेत.
- चौकट
१) मास्कचा वापर न करणाऱ्यास : ५०० "
२) सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन : १००० "
३) सार्वजनिक, खासगी जागेत थुंकणे : १००० "
४) प्रवासी वाहतुकीचा नियमभंग : १००० "
- चौकट
संस्था : कारवाई : दंड
कऱ्हाड पालिका : ११० : ५५,००० रु.
ग्रामीण पोलीस : २१० : १,०५,००० रु.
वाहतूक पोलीस : ३१४ : १,५७,००० रु.
पंचायत समिती : ६४० : ३,२०,००० रु.
उंब्रज पोलीस : १,१०० : ५,५०,००० रु.
तळबीड पोलीस : ३२० : १,६०,००० रु.
फोटो : २७केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.