खंडाळा : तालुक्यातील खंडाळा - लोणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले असतानाही खराब दर्जा आणि पाऊस यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईडपट्ट्यांवर टाकलेले मुरुमाचे ढिगारे आजही तसेच असल्याने ते अपघातांना निमंत्रण देत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
खंडाळा ते लोणंद रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी ठेकेदारांनी मुरुमाचे ढीग जागोजागी टाकले आहेत. गेल्या महिनाभरात हा मुरूम पसरला नसल्याने तसेच ढीग बाजूला पडून आहेत. यातील काही मुरूम रस्त्यावरही पडला आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरण्याची भीती आहे. तसेच या रस्त्यावरुन शेतात जाणाऱ्या ग्रामस्थांना शेतात आणि विविध कामांना जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जात असल्याने जीविताला धोका आहे. त्यातच तालुक्यात चार दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना एका वाहनाने ठोकरल्याने नाहक प्राण गमवावे लागल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता शाळा सुरू झाल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांनाही अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे रस्त्याच्या बाजूचा मुरुम पसरून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.
(कोट)
खंडाळा-लोणंद रस्त्याच्या बाजूने मुरुमाचे पडलेले ढीग पसरले नसल्याने अपघातांची शक्यता आहे. त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतो. रस्ता वाहतूक सुरक्षित करण्यासाठी हे काम तातडीने करावे, अन्यथा संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी.
-प्रदीप राऊत, माजी सरपंच, म्हावशी
फोटो आहेे...
०१खंडाळा
खंडाळा-लोणंद रस्त्याच्या बाजूने मुरुमाचे पडलेले ढीग पसरले नसल्याने अपघातांची शक्यता आहे.