सातारा : प्रवेशद्वारापासून बालकांच्या झांजपथकाच्या गजरात झालेले स्वागत... संस्थेतील बालकांसह उपस्थित सर्वांचाच अपूर्व उत्साह आणि ‘हॅपी बर्थडे टू यू’ या गीताला सर्वांनीच दिलेली साथ... अशा वातावरणात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचा वाढदिवस सातारा येथील निरीक्षणगृह व बालगृहात साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी मुदगल यांच्यासह संस्थेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी कृषी समिती सभापती किरण साबळे- पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, यांचे चिरंजीव वरदवर्धन व संस्थेतील वीस बालकांचा वाढदिवस येथे साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सचिन सारस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा पुरवठा अधिकारी शमा ढोक-पवार, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार राजेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, जिल्हाधिकारी मुदगल यांच्या पत्नी प्रतिभा, बालगृह संचालक डॉ. पारंगे आदी उपस्थित होते.मुदगल म्हणाले, ‘समाजातील बालकांना सक्षम करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. या भावनेतून सर्वांनी काम केल्यास एक चांगले सामाजिक कार्य होईल. एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. संस्थेतील बालकांसाठी पाच संगणक घेण्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येणार असल्याचे मुदगल यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी मुद्गल यांनी संस्थेतील बालकांसह केक कापून वाढदिवस साजरा केला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांसाठी तर मुदगल यांनी वाढदिवसाचे मानकरी असलेल्या बालकांसाठी गीत सादर केले. काजल दळवी, प्रदीप साबळे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)बालगृहातील बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी इच्छुकांनी पुढे यावे, यासाठी संस्थेचे संकेतस्थळ निर्माण करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी केली. जिल्हा परिषदेमार्फत या मुलांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्रोजक्टर देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा मानधनाचे अकरा हजार रुपये संस्थेला देणार असल्याची घोषणा केली.
बाळगोपाळांना मानधन देऊन वाढदिवस
By admin | Updated: December 16, 2014 00:12 IST