मायणी : येथील मुख्य चांदणी चौक व बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूचे गटारीचे काम गेल्या वर्षापासून अर्धवट अवस्थेत असल्याने व्यापारी व वाहनचालकांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. संबंधित कामावर कोणाचे नियंत्रण आहे, असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.
जानेवारी २०२० रोजी येथील मुख्य चांदणी चौक, मुख्य बाजारपेठ व गावभागातून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. मायणीतून जाणाऱ्या सुमारे दोन किलोमीटर अंतर असलेल्या या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम तीन ते चार महिन्यांत पूर्ण करून देतो, असे आश्वासन ग्रामस्थांना त्या वेळी झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आश्वासन ठेकेदारांकडून देण्यात आले होते.
तसेच मुख्य मार्गाच्या कडेला असलेल्या स्वमालकीच्या व रस्त्यामध्ये अडथळा येणारे अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या वेळी तीन-चार महिन्यांत पूर्ण रस्ता होणार, यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी स्वखर्चाने या मार्गावर अडथळा ठरत असलेले अतिक्रमण काढून घेतले. राज्य मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामास त्या वेळी सुरुवात झाली. मात्र विविध कारणांमुळे सतत हे काम रखडले आहे.
या दोन किलोमीटर अंतराच्या दोन्ही बाजूस असलेले गटारीचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत आहे तर राज्यमार्ग रुंदीकरणाच्या कामातही अनेक वेळा काम बंद राहत आहे. संबंधित ठेकेदारांना याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचारणा केली असता प्रत्येक वेळी उडवाउडवीची व चालढकलीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे रखडलेल्या या कामाचा त्रास या मार्गकडेला असलेल्या व्यापाऱ्यांना होत आहे, तर अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत काम असल्याने त्या कडेला पडणाऱ्या खड्ड्यांचा त्रासही वाहनचालकाला होत आहे.
(चौकट)
काम सोयीनुसार चालू, बंद..
मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गवरील सातारा जिल्ह्यातील सुमारे वीस किलोमीटर अंतराचे नियंत्रण हे सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून या कामाचा नकाशा सतत बदलत आहे. काम सोयीनुसार चालू, बंद असते, ठेकेदारांकडून ही मनमानी पद्धतीने सर्वेक्षण व काम सुरू आहे. अधिकाऱ्यांचेही या कामावर नियंत्रण आहे का नाही, असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. लाॅकडाऊन असल्यामुळे या कामासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. जे मजूर गटार बांधण्यासाठी आहेत ते लाॅकडाऊनमुळे इतरत्र अडकून पडले आहेत. त्यामुळे हे काम रखडले आहे. दोन-चार दिवसांत कामगार आले की काम सुरू केले जाईल, असे प्रत्येक वेळी सांगितले जाते.
(चौकट )
याच ठिकाणी कामगाराची टंचाई का?
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग कंपनीकडे आहे, याच कंपनीने गेल्या चार दिवसांमध्ये एक विक्रम केला, त्या वेळी
प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्वॉलिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते. एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी एवढ्या संख्येने लोक एकत्र येऊन काम करीत होते. मग याच ठिकाणी का कामगार मिळत नाहीत? असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.
०३मायणी
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मायणी येथील गटारीचे काम गेल्या वर्षभरापासून असे रखडले आहे.(छाया : संदीप कुंभार)