वडूज: छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात संपन्न होतो. राज्याच्या दृष्टीने हा दिवस सन्मानाचा दिवस असून, आपला अभिमान, स्वाभिमान आणि प्रेरणा देणारा दिवस म्हणून याकडे पाहिले जाते. याच गोष्टीला स्वातंत्र्याची, स्वराज्याची आणि सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयात हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे परिपत्रक ही राज्य शासनाने जारी केले आहे.
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद याठिकाणी शिवस्वराज्य दिन साजरी करण्यात येणार आहे. या संदर्भात १ जानेवारी रोजीच्या परिपत्रकानुसार सर्व मुख्य कार्यकाऱ्यांना राज्य शासनाने आदेश दिले आहेत. शिवस्वराज्य दिन कशा पद्धतीने साजरी करावयाची कार्यपद्धती ही परिपत्रकात स्पष्ट केली आहे. कोरोना अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून शिवस्वराज्य दिन साजरा करावा. त्यापद्धतीचे आदेश गटविकास अधिकारी यांना जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने दिलेले आहेत.
(चौकट..)
राज्याच्यादृष्टीने अभिमानास्पद..
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार रविवार, दि. ६ जून रोजी सकाळी ९ वाजता शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते उभारण्यात येईल. तर सूर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घेण्यात यावी. या दरम्यान राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून या शिवस्वराज्य दिनाची सांगता होणार आहे.
-------------------------------
- चौकट-
खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपंचायतींना याबाबत सर्व त्या सूचना दिलेल्या असून, कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरी करण्यासंदर्भात व्हीसी ही घेतली आहे. तर स्वराज्य गुढीसाठी भगवे झेंडेही वाटप करण्यात आले आहेत.
-रमेश काळे, गटविकास अधिकारी, खटाव- वडूज
----------------