रहिमतपूर : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ व ‘माझी वसुंधरा’ अभियान अधिक गतिमान करण्याबरोबरच याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी रहिमतपूर नगर परिषदेकडून रहिमतपूर येथे शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता हरित सायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी दिली.
या सायकल रॅलीत रहिमतपूर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यायामशाळा, दवाखाने, डॉक्टर्स असोसिएशन, शिकवणी वर्ग, व्यापारी, शिक्षक-विद्यार्थी-पालक, विविध महिला बचत गटांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
या महारॅलीचा प्रारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा माने-कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही सायकल महारॅली रहिमतपूर येथील गांधी चौकातून सुरू होणार असून, रोकडेश्वर मंदिर - नांगरे गल्ली - बागवान टेक नाका - रहिमतपूर नगर परिषद अशा मार्गाने जाणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली सायकल, स्वच्छता स्लोगन पाटी, शूज, हेल्मेट, पाणी बाटली आदी साहित्य स्वतः घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आनंदा कोरे यांनी केले आहे.